जलयुक्त शिवारसाठी साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

जलयुक्त शिवार अभियानाची कामे मध्यतरीच्या काळात रेंगाळली होती. गावांची निवड झाली. मात्र बहुतांश ठिकाणी निधी नसल्याने कामे रखडली होती. आता जिल्ह्यातल्या या कामांसाठी सुमारे साडेपाच कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. या योजनेतील 2017-18 आणि 2018-19 या वर्षात निवड करण्यात आलेल्या गावांतील कामांसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे.

राज्यातील गावे टंचाईमुक्त करण्यासाठी ही योजना राबविली जात आहे. या योजनेत दरवर्षी गावांची निवड करण्यात येते. या योजनेत मागील वर्षातील कामे पूर्ण करण्यावर भर देण्यात आला आहे. यासाठी जिल्हास्तरावर अधिकार्‍यांच्या बैठका घेतल्या जात आहेत. काही ठिकाणी कामे पूर्ण झाली असली तरी जिओ टॅगिंग केले नसल्याने राज्य पातळीवर दखल घेतली जात नसल्याचा मुद्दा समोर आला आहे. त्यामुळे संबंधित विभागांना जिओ टॅगिंगकडे दुर्लक्ष करू नये अशा सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सभेत देण्यात आल्या आहेत. तसेच या योजनेत मागील वर्षातील कामे पूर्ण करण्याच्याही सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आता मागील दोन वर्षांतील कामांसाठी राज्य सरकारने निधीही उपलब्ध करुन दिला आहे. त्यामुळे या योजनेतील अपूर्ण असलेली कामे संबंधित विभागांना वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत.