काठमांडूपासून दिल्लीपर्यंत भूकंपाचे धक्के! नेपाळमध्ये अनेक घरांची पडझड

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिमालयाच्या पर्वतरांगेत झालेल्या भूकंपाच्या धक्क्याने नेपाळपासून दिल्ली, उत्तराखंड, हरयाणा, उत्तर प्रदेश आणि राजस्थानपर्यंत हादरा बसला. भूतानलाही भूकंपाचे धक्के जाणवले. दरम्यान, भूकंपामुळे नेपाळमध्ये अनेक घरांची पडझड झाली असून, एका महिलेचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.

भूकंपाचा पेंद्रबिंदू नेपाळच्या पश्चिम भागातील बजूरा आणि  बजांग जिह्यातील मेला परिसरात आहे. दुपारी 2.43 वाजता भूकंपाचा हादरा बसला. भूकंपाची तीव्रता 5.9 रिश्टर स्केल इतकी नोंदविली गेली आहे. अनेक घरे कोसळली, शेकडो घरांना, एका मंदिराला तडे गेले. शेतात काम करणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. 40 बकऱ्या मृत्युमूखी पडल्याचे नेपाळ सरकारने म्हटले आहे. भूकंपाच्या हादऱ्याने नेपाळमध्ये प्रचंड घबराट पसरली. लोक रस्त्यांवर धावत आले. नेपाळ लष्कर आणि पोलिसांची पथके भूकंपग्रस्त भागात पोहोचली आहे. नुकसानीचा आढावा घेण्यात येत आहे.