
अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा मिळवल्यानंतर तेथे निर्माण झालेल्या अराजकतेवर बुधवारी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांच्या (एनएसए) बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली. तालिबानी दहशतवाद संपवला पाहिजे तसेच तेथील ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत, असे आवाहन हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी यावेळी केले. हिंदुस्थानच्या या भूमिकेला इतर सातही देशांनी पाठिंबा दिला.
तालिबान्यांच्या आक्रमणानंतर अफगाणिस्तानात सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. इतर देशांनाही तालिबानी दहशतवादाचा धोका असल्याच्या पार्श्वभूमीवर हिंदुस्थानने पुढाकार घेत बुधवारी दिल्लीत एनएसए बैठक बोलावली होती. या महत्त्वपूर्ण बैठकीला इराण, रशियाबरोबरच ताजिकिस्तान, किर्गिस्तान, कजाकीस्तान, उजबेकिस्तान आणि तुर्पमेनिस्तान या मध्य आशियाई देशांचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार उपस्थित होते. हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी या बैठकीचे नेतृत्व केले. पाकिस्तान आणि चीनलाही या बैठकीचे निमंत्रण देण्यात आले होते. मात्र दोन्ही देशांनी सहभागी होण्यास आधीच नकार कळवला. उपस्थित इतर देशांनी अफगाणिस्तानातील दहशतवाद आणि ड्रग्जची तस्करी रोखण्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्यावर भर दिला.
शेजारी देशांनी समन्वय राखण्याची वेळ आलीय, अजित डोवाल यांची भूमिका
अफगाणिस्तानातील सध्याच्या परिस्थितीवर शेजारच्या देशांनी विचारविनिमय करणे तसेच अधिक सहकार्य आणि समन्वय राखण्याची वेळ आली आहे. केवळ अफगाणिस्तानच्या लोकांसाठीच नाही तर शेजारी देशांवरही तालिबान्यांच्या दहशतीचा महत्त्वपूर्ण परिणाम होत आहे, असे हिंदुस्थानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी बैठकीतील अध्यक्षीय भाषणात सांगितले.
बैठकीतील महत्त्वपूर्ण मुद्दे
n अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तेथील लोकांच्या मदतीसाठी आपण एकत्रित प्रयत्न केले पाहिजेत.
n आज संपूर्ण जगापुढे कठीण परिस्थिती निर्माण झाली आहे. अफगाणिस्तानात दहशतवादी संघटना सक्रिय होत आहेत.
n अफगाणिस्तानच्या निर्वासितांचे मोठे संकट उभे राहिले आहे. तेथील सर्व समाजाच्या लोकांना सरकारमध्ये सहभागी करूनच यावर तोडगा निघू शकतो.
n अफगाणिस्तानच्या लोकांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती बिघडत चालली आहे.



























































