59 लाखांच्या दरोडा प्रकरणी आणखी पाच आरोपींना अटक; खेड पोलिसांची कामगिरी

खेडमध्ये 16 सप्टेंबर रोजी पडलेल्या 59 लाख रुपयाच्या दरोड्यातील आणखी 5 जणांच्या मुसक्या आवळण्यात खेड पोलिसांना यश आले आहे . रायगड जिल्हयातील म्हसळा येथील जंगलातून पाच जणांना पोलिसांनी रायगड पोलिसांच्या मदतीने अटक केली आहे. या दरोडयात वापरण्यात आलेली एक कार आणि पाच दुचाकी पोलीसानी ताब्यात घेतल्या आहेत. त्याचप्रमाणे 2 लाख रूपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी खेडचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील आणि पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली खेड पोलिसांची तपास पथके वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली होती.

पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांचे पथक रायगड जिल्ह्यामध्ये तपास करीत असताना त्यांना माहिती मिळाली की गुन्ह्यातील काही आरोपी म्हसळा परिसरात असण्याची शक्यता आहे. त्यामुळे पथक तात्काळ म्हसळा येथे रवाना झाले. म्हसळा परिसरात शोध घेतल्यानंतर आरोपींचा काहीही थांगपत्ता लागला नाही. आरोपींचा मोबाईलचा रिचार्ज संपल्याने ते कोणाशी संपर्क साधू शकत नसल्याची महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाली. ही माहिती मिळाल्यावर पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी एका आरोपीच्या मोबाईलवर 50 रुपयांचा रिचार्ज केला. रिचार्ज केल्यानंतर काही वेळातच आरोपीचा त्याच्या भावाशी संपर्क झाला. त्यामुळे आरोपी म्हसळ्याच्या जंगल परिसरात लपून बसल्याचे स्पष्ट झाले. पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम यांनी जंगल परिसरात सापळा रचला आणि जंगलात लपून बसलेल्या पाच आरोपींना अटक केली. त्यांच्याकडून पाच मोबाईल फोन, एक मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे. या दरोडा प्रकरणात आणखी पाच आरोपींना अटक झाल्याने या गुन्ह्यातील एकूण 8 आरोपींना अटक झाली आहे.

विक्रम वसंत चव्हाण, सिद्धेश विठ्ठल पवार, नरेश वसंत चव्हाण, विजय गौरीशंकर भगत, प्रमोद उर्फ बबल्या रामचंद्र चव्हाण, दीपक माणिक चव्हाण, अंकुश पंढरीनाथ पवार, मनोज रमेश जाधव अशी या प्रकरणातील आरोपीची नावे आहेत. त्यांच्याकडून आतापर्यंत जवळपास दोन लाख रुपये, एक कार, पाच मोटरसायकल व आठ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. ही कारवाई पोलिस अधीक्षक रत्नागिरी, अप्पर पोलीस अधीक्षक रत्नागिरी, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रवीण पाटील व पोलीस निरीक्षक खेड सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक शिवाजी बांगर यांच्या पथकाने केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी फरारी आहे. मात्र, लवकरच त्याला अटक करण्यात येईल, असा विश्वास खेड पोलिसांनी व्यक्त केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या