नाल्यात कचरा टाकल्यास 500 रुपये दंड, क्लीन-अप मार्शल, सीसीटीव्हीची नजर राहणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

नाल्यात कचरा टाकताना आढळल्यास 200 ते 500 रुपयांचा दंड करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. नाल्यात कचरा टाकणाऱयांवर नजर ठेवण्यासाठी क्लीन-अप मार्शल आणि सीसीटीव्हीची मदत घेण्यात येणार आहे.

स्वच्छ-सुंदर मुंबई या मोहिमेंतर्गत रस्ते, फुटपाथ, गटर आणि नाल्यांची स्वच्छता केली जात आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली त्या ठिकाणी परिसरात नागरिकांनी पुन्हा कचरा टाकू नये, अन्यथा स्वच्छतेसाठी केलेले प्रयत्न निष्फळ ठरतात. त्यामुळे कोणत्याही ठिकाणी नाल्यांमध्ये नागरिकांनी कचरा टाकू नये, असे आवाहन पालिकेने आहे. शिवाय या प्रकाराला आळा घालण्यासाठी आता दंडाची कारवाईदेखील करण्यात आली आहे.

असे होतेय स्वच्छतेचे काम

पालिकेच्या माध्यमातून अवघ्या पंधरा दिवसांत एकूण 1042 मेट्रिक टन राडारोडा (डेब्रिज), 139 मेट्रिक टन घनकचऱयाचे अतिरिक्त संकलन करण्यात आले आहे. त्यासाठी 3700 कामगार-कर्मचाऱयांनी अविरत श्रमदान केले आहे.

मनुष्यबळाबरोबरच 33 जेसीबी, 148 डंपर, 21 कॉम्पॅक्टर, 71 फायरेक्स मशीन, 69 वॉटर टँकर, 6 सक्शन मशीन, पीकर मशीन, 9 रोड स्वीपिंग मशीन आणि 7 मिस्टिंग मशीन याप्रमाणे एकूण 367 संयंत्रांचाही वापर करण्यात आला आहे.

या मोहिमेदरम्यान नाल्यांमध्ये नागरिकांकडून वारंवार कचरा टाकण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. या कचऱयामध्ये थर्माकॉल, प्लॅस्टिक पिशव्या, फर्निचर, रबर, रॅपर्स अशा तरंगत्या कचऱयाचा समावेश आढळून आल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.