
सामना ऑनलाईन, नवी दिल्ली
गर्दीच्या ठिकाणी चोर हात साफ करतात हे सगळ्यांनाच माहिती आहे. दिल्ली पोलिसांनी असे चोर पकडलेत जे खासकरून मोदींच्या सभांमध्ये घुसून चोऱ्या करायचे. पोलिसांनी या टोळीच्या म्होरक्यासह त्याच्या साथीदाराला अटक केली आहे. अस्लम आणि मुकेश उर्फ गोलू अशी या चोरांची नावे आहेत. यातील अस्लम हा कुख्यात गुंड असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
अस्लम आणि गोलू हे चोरी करण्यासाठी १८ वर्षांचे तरुण हेरायचे आणि त्यांना चोरी कशी करायची हे शिकवायचे. मोठमोठ्या कार्यक्रमांमध्ये हे दोघे साथीदारांसह घुसायचे आणि जमेल तितक्या लोकांना लुटायचे. ए.वन रेस, मोदींच्या सभा, लाईव्ह कॉन्सर्ट, ऑटो शो अशा उच्चभ्रू लोकांचा वावर असलेल्या ठिकाणीच हे चोर घुसायचे. अत्यंत उंची कपडे घालून आणि स्टायलिश अंदाजात हे चोर फिरत असल्याने त्यांच्यावर कोणी संशय घेत नव्हतं. मोबाईल, पैशांनी गच्च भरलेली पाकीटं हे सगळे जण उडवायचे आणि फरार व्हायचे.
या चोरांनी मुंबईतील गणपती विसर्जन, जस्टीन बीबरची कॉन्सर्ट, आयपीएलचे सामने, गोव्यातील नववर्षाच्या स्वागतासाठी होणारे कार्यक्रम या सगळ्या ठिकाणी चोरी केली आहे. वेळ वाचावा यासाठी अस्लम आणि त्याचा साथीदार हे विमानाने प्रवास करायचे हे ऐकून पोलीसही आश्चर्यचकीत झाले आहेत. या टोळीने आत्तापर्यंत किमान ५ हजार मोबाईल चोरल्याचं कबूल केलं आहे.
























































