गिरणी कामगारांसाठी मुंबईत म्हाडाची 5090 घरे तयार, लवकरच लॉटरी निघणार

136
प्रातिनिधिक फोटो

सामना प्रतिनिधी । मुंबई

वर्षानुवर्षे घराच्या प्रतीक्षेत असलेल्या गिरणी कामगारांना खूशखबर आहे. गिरणी कामगारांना मुंबईत घरे देण्यासाठी म्हाडा लवकरच 5090 घरांची लॉटरी काढणार आहे. या घरांसह राज्यभरात 14 हजार 621 घरांसाठी 15 ऑगस्टपर्यंत टप्प्याटप्प्याने लॉटरी निघणार आहे.

गिरणी कामगारांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडाने याआधी वेळोवेळी लॉटरी काढली आहे. त्यामध्ये विजेत्या ठरलेल्या कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण आहे, तर प्रतीक्षा यादीवरील कामगार नाराजी व्यक्त करत होते. त्यांच्याबरोबरच सर्वसामान्यांचे गृहस्वप्न पूर्ण करण्यासाठी लवकरच लॉटरी काढणार असल्याची घोषणा आज म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी केली. म्हाडा मुख्यालयात झालेल्या प्राधिकरणाच्या बैठकीला अध्यक्ष उदय सामंत, मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

पुनर्विकास धोरण 20 दिवसांत

मुंबईत म्हाडाच्या 56 मोठय़ा वसाहती आहेत. काही ठिकाणी पुनर्वसन सुरू आहे. मात्र सध्या खासगी बिल्डरांच्या माध्यमातून पुनर्वसन सुरू आहे. यामध्ये अनेकदा बिल्डरांकडून फसवणूक होते. त्यामुळे पुनर्विकासाला विलंब लागतो. त्यामुळे रखडलेल्या इमारतींचा म्हाडाने पुनर्विकास करावा, अशी मागणी रहिवाशांनी सुरू केली आहे. त्यामुळे पुनर्विकासाबाबत धोरण निश्चित करण्याचा निर्णय म्हाडाने घेतला आहे. त्यासाठी सभापती मधू चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आली आहे. ही समिती वीस दिवसांत अहवाल जाहीर करील, अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.

मुंबई – 5090
(गिरणी कामगारांसाठी)
नाशिक – 92
संभाजीनगर – 142
कोकण – 5300
(पालघर, विरार, कल्याण)
अमरावती – 1200
नागपूर – 891
पुणे – 2000

आपली प्रतिक्रिया द्या