
तुरुंगाची हवा भल्याभल्या गुन्हेगारांना वठणीवर आणते. त्यामुळे एकदा शिक्षा भोगून आल्यानंतर पुन्हा कारागृहाचे नाव जरी काढले तरी त्यांना कापरे भरते. मात्र राज्यातील विविध कारागृहांतील सोयीसुविधा, कोरोना लसीकरण, खाद्यपदार्थांची चंगळ, सुरक्षिततेमुळे 53 कैद्यांना घरी जावेसे वाटत नाही. पॅरोल मंजूर होऊनही संबंधित कैद्यांनी घरी जाण्यास नकार दिला आहे. कारागृह प्रशासनाच्या उत्तम नियोजनामुळे कैद्यांनी तुरुंगाबाहेर न जाता कारागृहात राहणार असल्याचे प्रशासनाला सांगितले आहे.
कोरोनामुळे थैमान घातले असताना राज्यभरातील कारागृह प्रशासनाने युद्धपातळीवर उपाययोजना केल्या होत्या. विशेषतः लसीकरणाला प्राधान्य देऊन बाधितांची संख्या कमी करण्यावर भर देण्यात आला. त्यामुळे विविध कारागृहांतील 53 कैद्यांना सुरक्षिततेचा चांगलाच अंदाज आला. पॅरोल मंजूर होऊनही संबंधित कैद्यांनी आम्हाला घरी जायचे नाही, कारागृहातच चांगली सुविधा उपलब्ध झाली आहे. उत्तम जेवण, पुरेशी सुरक्षितता, आरोग्य प्रशासनाकडून राबविण्यात येणाऱया विविध उपक्रमांमुळे कैद्यांनी पॅरोलला नकार दिला आहे. दरम्यान, कारागृहातून कधी एकदा सुटका होते याकडे अनेकांचे लक्ष असते. त्यासाठी विविध प्रयत्न केले जातात. मात्र सध्याची परिस्थिती वेगळी असून राज्यभरातील कारागृहांमध्ये नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून कैद्यांना विविध सोयीसुविधा उपलब्ध केल्या जात आहेत.
पॅरोल मंजूर होऊनही 53 कैद्यांनी कारागृहातच राहण्यास पसंती दिली आहे. आम्हाला कारागृहात बरे वाटते, आमची येथे काळजी घेतली जाते. आरोग्य, खानपान सेवा चांगल्या पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे आमची सुरक्षितता कारागृहात जास्त असल्याचे कैद्यांकडून सांगितले जाते. दरम्यान, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार संबंधित कैद्यांना जाण्याचा आग्रह प्रशासनाकडून करण्यात येत नाही. – सुनील रामानंद, अपर पोलीस महासंचालक व कारागृह महानिरीक्षक


































































