नगर महापालिकेचे 5615 थकबाकीदार 50 हजारीपार; मालमत्ताधारकांना लोकअदालतीमार्फत नोटिसा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

महापालिकेच्या थकबाकीदारांना शास्ती माफी देऊनही त्यांनी कर भरण्याकडे नागरिकांचा कानाडोळा आहे. आता थकबाकीदार मालमत्ताधारकांना लोकअदालतीमार्फत नोटिसा पाठविल्या आहेत. शहरात 50 हजारांच्या पुढील 5 हजार 615 थकबाकीदार आहेत. तर, 25 हजारांच्या पुढील 11 हजार 82 थकबाकीदार आहेत. 20 हजारांपढील 14 हजार थकबाकीदार असून, वसुली करताना मनपा कर्मचाऱयांची दमछाक होत आहे.

सर्वसाधारण कर, पथकर, मलनिस्सारण, मलनिस्सारण लाभ कर, जललाभ कर, अवैध बांधकाम शास्ती, साफसफाई कर, घनकचरा कर, वृक्ष कर, पाणीपट्टी, शिक्षण कर, रोजगार हमी कर, मोठय़ा निवासी कर यांसह विविध गोष्टींसाठी मनपा मालमत्ताधारकांकडून कर वसूल करते.

मालमत्ताधारकांकडून चालू वर्षीची 50 कोटी 66 लाखांची मागणी होती. त्यात चालू वर्षीची अवघी 27 कोटी 29 लाखांची वसुली झाली. चालू वर्षीच 23 कोटी 36 लाखांची थकबाकी राहिली आहे. मालमत्ताधारकांकडे आतापर्यंत 187 कोटी 36 लाखांची थकबाकी राहिली आहे.

कर सूट योजना देऊन मालमत्ताधारकांना कर भरण्याकडे पाठ फिरविली आहे. त्यावर आयुक्तांनी अनेक वेळा बैठका घेऊनही उपयोग झाला नाही. थकीत मालमत्ताधारकांचे नळकनेक्शन बंद करणे, जप्तीची नोटीस बजाविणे, मोटारसायकल जप्त करणे, कर थकविणाऱयांचे प्लेक्स प्रभागात लावणे अशा कारवाईची मोहीम राबवूनही थकबाकीदार जुमानत नाहीत. प्रत्येक प्रभाग समितीत मनपाचे पथक फिरत आहे. परंतु, वसुलीला प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे आता थकबाकीदारांना थेट लोकअदालतमध्ये हजर राहून कर भरण्याची संधी देण्यात आली आहे.

बडय़ांकडे लाखोंची थकबाकी

महापालिकेच्या चारही प्रभाग समिती कार्यालयामध्ये बडय़ा लोकांकडे कोटय़वधींची थकबाकी आहे. वसुली पथक त्यांच्याकडे गेल्यानंतर नेत्याचा फोन येतो आणि पथक रिकाम्या हाताने परत येते. त्यामुळे बडय़ांची थकबाकी वाढतच चालली आहे.