पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी नदीत उडी मारली, पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करून पकडलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

झारखंडमध्ये पोलिसांनी सिने स्टाईल पाठलाग करत आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. सायबर गुन्ह्यांतील आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी सापळा रचला होता. मात्र पोलिसांच्या तावडीतून सुटण्यासाठी आरोपींनी नदीत उडी मारली. यानंतर पोलिसांनीही नदीत उडी घेत पाठलाग केला आणि आरोपींना अटक केली.

इंटरनेटच्या युगामध्ये सायबर गुन्ह्याचे प्रकार वाढले आहेत. यासाठी आरोपी विविध अॅप्सचा वापर करतात. झारखंडमध्येही हा प्रकार सुरू असून आरोपी अॅप्सद्वारे नग्न व्हिडीओ कॉल करून पीडितांना ब्लॅकमेल करत होते आणि त्यांच्याकडून पैसे उकळत होते. या आरोपांना पकडण्यासाठी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले होते. आरोपींचा शोध घेत असताना पोलिसांना एक टीप मिळाली.

नदीकाठी बसून काही गुन्हेगार नागरिकांची फसवणूक करत असल्याची माहिती खबऱ्याने पोलिसांना दिली. आरोपींना पकडण्यासाठी पोलीस साध्या कपड्यामध्ये गावात पोहोचले होते. पोलिसांच्या पथकाने सापला रचून आरोपींना घेरले. मात्र पोलीस मागावर असल्याचा सुगावा लागल्याने आरोपींनी नदीत उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनीही नदीत उडी घेतली आणि पोहून जात आरोपींना बेड्या ठोकल्या. यावेळी गावकऱ्यांच्या विरोधाचाही पोलिसांनी सामना करावा लागला.

दरम्यान, अटकेतील आरोपी नग्न व्हिडीओ कॉल करून त्याचे स्क्रिनशॉट काढायचे आणि फसवणूक करायचे. तसेच गरोदर महिलांना पैशाचे आमिष दाखवून त्यांचीही फसवणूक करायचे. मात्र या आरोपांना आता अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून 8 लाख 29 हजार 600 रुपये रोख, 12 मोबाईल फोन, 18 सिमकार्ड, 21 एटीएम कार्ड, 12 पासबुक, 6 चेकबुक, 4 पॅन कार्ड आणि 2 आधार कार्ड जप्त केले आहेत. या प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत.