सुपरsss! कर भरणार्‍यांची संख्या 60 टक्क्यांनी वाढली

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन | नवी दिल्ली

देशात यंदा आयकर भरणार्‍यांची संख्या ही 5 कोटींपर्यंत पोहोचल्याची माहिती मिळते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही वाढ तब्बल 60% इतकी आहे. विशेष म्हणजे निश्चित वेळेत 31 ऑगस्ट 2018 पर्यंत नोकरदारवर्ग, व्यावसायिक यांना आयकर भरण्याचा वेळ दिला आहे. केंद्र सरकारने 31 जुलैपर्यंतची दिलेली मुदत 31 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली होती. मात्र आता पुन्हा मुदत वाढ देण्यात येणार नाही. त्यामुळेच वेळेत कर भरणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

31 ऑगस्ट ही शेवटची तारीख असल्याने गुरुवारी तब्बल 20 लाख जणांनी आयकर भरण्यासाठी अर्ज केला आहे. दंडात्मक कारवाई टाळण्यासाठी कर भरणार्‍यांनी ही धावाधाव केल्याचे समजते.

पूर्वीच्या सरकारने आधीच्या वर्षाचा आयकर भरण्यासाठी चालू आर्थिक वर्षातील मार्चपर्यंतची मुभा दिली होती आणि त्यासाठी दंडही आकारण्यात येत नव्हता. पण मोदी सरकारने 31 जुलैपर्यंत ही मुदत दिली आणि फक्त एक महिन्याची मुदत वाढ दिली. तसेच मुदतीत कर न भरल्यास दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देशही दिले. त्यामुळे वेळेत कर न भरणाऱ्यांचे धाबे दणाणले आहे.

जीएसटीमुळे आयकर भरणाऱ्यांची संख्या वाढली?

आयकर भरणाऱ्यांच्या संख्येत दिसणारी प्रचंड वाढ हा केवळ 31 ऑगस्टपर्यंतची मुदत आणि त्यानंतर लागणारा दंड यामुळेच आहे असे नाही. तर जीएसटी रजिस्ट्रेशनमुळे व्यापाऱ्यांचा व्यवहार कागदपत्रावर आला आहे. त्यामुळे आयकर भरताना आकडेवारी तपासली जाईल आणि तफावत आढळल्यास कारवाई होण्याची शक्यता असल्याने देखील मोठ्याप्रमाणावर आयकर भरणाऱ्यांची संख्या वाढल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.