भाडे नाकारणाऱया 625 रिक्षा-टॅक्सीचालकांचा परवाना निलंबित

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

भाडे नाकारणाऱया मुजोर रिक्षा-टॅक्सीचालकांना प्रादेशिक परिवहन विभागाने चांगलाच दणका दिला आहे.  आरटीओच्या हेल्पलाईनवरील गेल्या तीन महिन्यांत 705 भाडे नाकारल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्याची खातरजमा करत संबंधित आरटीओ कार्यालयांनी 625 रिक्षा-टॅक्सीचालकांचा परवाना निलंबित केला आहे. त्यामुळे भाडे नाकारणाऱया रिक्षा-टॅक्सीचालकांचे धाबे दणाणले आहेत.  मुबई शहरात जवळपास 45 हजार तर उपनगरात सव्वा लाख रिक्षा धावत असल्या तरी सकाळी गर्दीच्या वेळी रिक्षा-टॅक्सीचालक सर्रासपणे भाडे नाकारतात. त्याची गंभीर दखल घेत प्रवाशांना सहजपणे आरटीओ विभागाकडे तक्रार करता यावी म्हणून 9152240303 हा व्हॉट्सऍप क्रमांक दिला आहे. त्यावर आतापर्यंत 900 हून अधिक तक्रारी आल्या असून त्यातील 705 तक्रारी या भाडे नाकारण्याच्या आहेत. त्यापैकी 625 जणांचा परवाना निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच प्रवाशांकडून अवाच्या सवा भाडे घेतल्याप्रकरणी 85 जणांवर तर उद्धट वर्तन केल्याने 134 जणांवर कारवाई करण्यात आल्याचे आरटीओ विभागाने स्पष्ट केले आहे.