ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेने घेतलेल्या 63 तासांच्या मेगाब्लॉकचा फटका चाकरमान्यांना बसला आहे. आज तब्बल 534 लोकल सेवा रद्द केल्या. कल्याणहून सुटणाऱया लोकल रद्द झाल्याने कल्याण, डोंबिवली, दिवा, मुंब्रा स्थानकात प्रचंड गर्दी उसळली होती. या गर्दीमुळे प्रवाशांनी दिवा स्थानकात येण्यापूर्वीच लोकलचा दरवाजा बंद केला. त्यामुळे गर्दीने हैराण झालेल्या प्रवाशांचा पारा चढला आणि त्यांनी लोकलचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न केला.
मध्य रेल्वेतर्फे ठाणे आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील प्लॅटफॉर्मच्या रुंदीकरणासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. याचा मोठा फटका कसारा, कर्जतपासून मुंबईपर्यंत प्रवास करणाऱया लाखो चाकरमान्यांना बसला. शुक्रवारपेक्षा आज अधिक लोकल रद्द केल्यामुळे प्रवाशांची मोठी गर्दी मध्य रेल्वेच्या सर्व स्थानकांवर झाली होती. कल्याणहून सुटणाऱया लोकल रद्द केल्या. कर्जत, कसाऱयावरून येणाऱया लोकलमध्ये चढता येत नसल्याने कल्याण, ठाकुर्ली आणि डोंबिवली स्थानकात गर्दी झाली होती. दिवा स्थानकात मुंबईकडे जाणारी लोकल फलाटावर येण्यापूर्वीच आतील प्रवाशांनी दरवाजा बंद केला. त्यामुळे प्रचंड गोंधळ व रेटारेटी झाली. दरवाजा बंद केल्याने दिवावासीयांना लोकलमध्ये चढताच आले नाही. या प्रकारामुळे दिवा स्थानकात प्रवाशांच्या संतापाचा कडेलोट झाला. याबाबत रेल्वे प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याने प्रवाशांना वाली कोण? असा प्रश्न निर्माण झाला.
प्रवाशांची लूट
लांब पल्ल्याच्या अनेक गाडय़ा ठाणे स्थानकात रद्द करण्यात आल्या. त्यामुळे प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. प्रवाशांनी रिक्षा, टॅक्सी आणि ओला-उबरच्या माध्यमातून गाडय़ा बुक करून घराकडे कूच केली. याचा फायदा खासगी वाहनचालकांनी घेतला असून अवाच्या सवा भाडेवाढ केली. त्यामुळे प्रवाशांचा खिसा रिकामा झाला.