
कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतेय. लॉकडाऊन टाळण्यासाठी गर्दी करू नका सांगितले तर ऐकत नाहीत. संचारबंदी लावली तरी बिनकामाचे घराबाहेर पडतात. नाकावर मास्क लावण्याचे भान ठेवत नाहीत. नागरिकांना स्वतःच्या सुरक्षेची काळजीच नाही. बाजारात गर्दी, दुकानांमध्ये गर्दी, रेल्वेत, बसेसमध्येही गर्दी.
नागरिकांनाच कडक लॉकडाऊन हवा आहे की काय अशी स्थिती सध्या राज्यात दिसून येत आहे. आज 63 हजार 729 नवे रुग्ण राज्यात सापडले. नागरिकांचा निष्काळजीपणा असाच सुरू राहिला तर कदाचित येणारे संकट अधिक गंभीर आणि भयावह असू शकते असा इशाराच तज्ञांनी दिला आहे.
कठोर कारवाई करण्याची वेळ येऊ देऊ नका
संचारबंदी लागू असतानाही नागरिक विनाकारण घराबाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे निर्बंध आणखी कठोर करण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात येत आहेत. तेव्हा नागरिकांनी याची दखल घेऊन कठोर कारवाई करण्याची वेळ येऊ नये असा इशारा मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिला आहे.
धारावीचे काय होणार?
राज्यात संचारबंदी लागू असली तरी अनेक शहरांमध्ये काही महाभागांचा विनाकारण मुक्त संचार सुरू आहे. धारावीही त्याला अपवाद नाही. येथील सर्व व्यवहार प्रचंड गर्दीत सुरू असल्याने कोरोनाला रोखायचे कसे हाच प्रश्न आहे.
…तर राज्यात कडक लॉकडाऊन!
पुणे – अनेक नागरिकांकडून निर्बंधांचे पालन होत नाही म्हणून कठोर निर्णय घेण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी प्रतिसाद दिला नाही तर नाइलाजास्तव राज्यात पूर्वीप्रमाणे पुन्हा कडक लॉकडाऊन करावा लागू शकतो, असा इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिला आहे. राज्यातील प्रत्येक आमदाराच्या निधीतून कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांसाठी एक कोटी रुपये खर्च करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहितीही पवारांनी दिली.




























































