रायगडातील २९४ गावात पाणीबाणी, ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा, जलजीवन मिशन योजनेचा बोजवारा उडाला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुरेसा पाऊस पडूनल्यानंतरही रायगड जिल्ह्यातील २९४ गावे आणि वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई निर्माण झाल्याने ग्रामस्थांवर हंडाभर पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. टंचाईग्रस्त गावांमध्ये जिल्हा परिषदेमार्फत ६४ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. मात्र हे पाणी पुरेसे नसल्यामुळे काही गावांमध्ये ग्रामस्थांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. जिल्ह्यात सर्वाधिक पाणीटंचाई असलेली गावे आणि वाड्या महाड तालुक्यात १०१ आहेत. जलजीवन मिशनचा बोजवारा उडाल्यामुळे ग्रामस्थांना या पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

रायगड जिल्ह्यात प्रत्येक वर्षी पुरेशा प्रमाणात पाऊस पडतो. तरी जिल्ह्यातील ग्रामीण भागाला उन्हाळ्याच्या शेवटी पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. यंदाही जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये पाणीटंचाईची तीव्र झळ बसली आहे. एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला जिल्ह्यातील २२ गावे व ६० वाड्यांवर पाणीटंचाई निर्माण झाली होती. या टंचाईग्रस्त भागांत १५ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. महिनाभरात टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये १७५ ने वाढ झाल्याने मे महिन्याच्या सुरुवातीला ४२ गावे व १४८ वाड्यांना ५० टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा करण्यात येत होता. तर सद्यस्थितीत टंचाईग्रस्त गावे, वाड्यांमध्ये आणखी ६८ ने वाढ झाली असून ६४ गावे व २३० वाड्यांवर ६४ टँकरच्या माध्यमातून पाणीपुरवठा सुरू आहे.

मुदतवाढ देऊनही कामे पूर्ण झाली नाहीत

जलजीवन मिशन योजनेंतर्गत जिल्ह्यात १ हजार ४२२ योजनांची कामे हाती घेण्यात आली असून ही कामे डिसेंबर २०२३ अखेरपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. विहित मुदतीत कामे पूर्ण न झाल्याने अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ठेकेदारांना दोन वेळा मुदतवाढ देण्यात आली. मात्र त्यानंतरही जिल्ह्यातील ६०० हून अधिक योजनांची कामे अद्यापही अपूर्ण राहिली असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.

प्रशासनाला पाणी पुरवठ्याचे योग्य नियोजन करता आलेले नाही. योग्य नियोजनाअभावी ही परिस्थिती निर्माण होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे.
पाणीटंचाईवर कायमचा तोडगा काढण्याऐवजी तात्पुरत्या उपाययोजना करण्याकडेच प्रशासनाचा जोर आहे. त्यामुळे वर्षानुवर्षे त्याच त्या गावांना पाणीटंचाईची झळ बसत असल्याची संतप्त प्रतिक्रिया ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे.
टंचाईग्रस्त भागांत टँकरद्वारे होत असलेला पाणीपुरवठा पुरेसा नसल्याने या गावांतील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. दोन ते तीन किलोमीटरची पायपीट करून त्यांना पाणी आणावे लागत आहे.
जनतेला स्वच्छ आणि शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, तसेच गावातील महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारमार्फत जलजीवन मिशन ही योजना राबवण्यात येत आहे. ग्रामीण भागातील सर्व कुटुंबांना सन २०२४ पर्यंत ‘हर घर नल से जल’ या योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. या योजनेमध्ये प्रतिदिन प्रतिमाणसी किमान ५५ लिटर याप्रमाणे पाण्याची उपलब्धता करणे अपेक्षित आहे. मात्र रायगड जिल्ह्यात या योजनेचा बोजवारा उडाला आहे.