पश्चिम बंगाल – बीरभूममध्ये कोळसा खाणीत स्फोट; 7 मजुरांचा मृत्यू, अनेक जखमी

पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्ह्यातील एका कोळसा खाणीमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यात सात मजुरांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारांसाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. लोकपूर पोलीस स्थानकांतर्गत येणाऱ्या कोळसा खाणीत हा स्फोट झाला असून यामागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

प्राथमिक माहितीनुसार, गंगारामचक मायनिंग प्रायव्हेट लिमिटेड कोलियरी (जीएमपीएल) या कंपनी खाणीमध्ये कोसळा क्रशिंग करत असताना स्फोट झाला. स्फोटानंतर जीएमपीएलच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी बाहेर धाव घेतली. मात्र यादरम्यान 7 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून अनेक जखमी झाले.

कोसळा खाणीत स्फोट झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. या भागातील स्थानिक आमदारही घटनास्थळी पोहोचले असून सध्या बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. मजुरांना सुरक्षित बाहेर काढण्याचे काम सुरू असून मृतांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ‘आज तक‘ने याबाबत वृत्त दिले आहे.

बातमी अपडेट होत आहे…