कर्नाटकात 70 टक्के मतदान! भाजप जाणार; काँग्रेस येणार!!‘एक्झिट पोल’चा अंदाज; सत्तांतर अटळ

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीचे आज मतदान झाले. 224 जागांसाठी सरासरी 70 टक्के मतदानाची नोंद झाली आहे. दरम्यान, विविध वृत्तवाहिन्या आणि संस्थांच्या ‘एक्झिट पोल’च्या अंदाजानुसार कर्नाटकात कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहूमत मिळणार नसले तरी सत्ता परिवर्तन अटळ आहे. त्यामुळे भाजपच्या पराभवाचीच स्क्रिप्ट मतदारांनी लिहिली आहे. दक्षिणेतील या एकमेव राज्यात असलेली भाजपची सत्ता जाणार आणि येथे काँग्रेस पक्ष सरकार बनविणार हे शनिवारी (दि. 13) निकालानंतरच स्पष्ट होईल.

कर्नाटक विधानसभेच्या 224 जागा आहेत. बहुमतासाठी 113 मॅजिक फिगरची आवश्यकता आहे. मतदानानंतर विविध वृत्तवाहिन्यांनी जाहीर केलेल्या ‘एक्झिट पोल’नुसार काँग्रेस पक्ष काठावरचे बहुमत मिळवून सरकार बनवेल असाच अंदाज आहे.

मतदारांमध्ये उत्साह

सकाळी 7 वाजता 224 मतदारसंघातील 58545 केंद्रांवर मतदानाला सुरुवात झाली. सकाळपासून मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. अनेक ठिकाणी मतदान केंद्रांबाहेर रांगा लागल्या होत्या. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार 70 टक्के मतदान झाले. 2018 मध्ये मतदानाची टक्केवारी 72.36 होती.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, एच. डी. कुमारस्वामी, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी. के. शिवकुमार या दिग्गज नेत्यांसह 2615 उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रात बंद झाले.

बेल्लारी येथे काँग्रेस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झटापट होऊन हाणामारी झाली. त्यात अनेकजण जखमी झाले. विजयपूरा येथे ‘ईव्हीएम’मध्ये गडबडच्या संशयावरून जमावाने निवडणूक अधिकाऱ्यांची गाडी थांबवून तोडफोड केली.

‘जेडीएस’किंगमेकर ठरणार?

2018च्या निवडणुकीत कर्नाटकात कोणत्याही पक्षाला बहुमत न मिळाल्यामुळे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आली. काँग्रेस आणि जनता दल सेक्युलर (जेडीएस) यांचे आघाडी सरकार बनले. एच. डी. कुमारस्वामी मुख्यमंत्री झाले. मात्र, भाजपने फोडाफोडीचे राजकारण करून 2019 मध्ये आपले सरकार बनविले. यावेळीही त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात आल्यास जेडीएस किंगमेकर ठरेल, अशी शक्यता आहे.

एकूण जागा 224 – बहुमतासाठी 113

संस्था    काँग्रेस भाजप      जनता दल(सेक्युलर) इतर

  • टाइम्स नाऊ       113 85     23      3
  • एबीपी-सी वोटर 100-118   83-95 21-29     2-6
  • जन की बात       91-106     94-117      14-24     0-2
  • न्यूज नेशन         86   114   21      3
  • झी न्यूज  103-118    79-94 25-33 2-5
  • टीव्ही-9  99-109      88-98 21-26 0-4
  • इंडिया टुडे         122-140   62-80 20-25     –
  • इंडिया टीव्ही      110-120   80-90 20-24     0-2