
‘देवा, तुझ्याशिवाय मला आधार नाय! नातीच्या उपचारांसाठी 40 हजार रुपये व्याजाने घेतले खरे; पण पाच वर्षांत त्याने माझ्या पेन्शनचे आठ लाख रुपये उकळले. तरीही व्याज आणि मुद्दल अजून फिटलंच नाय, असं सांगून मला त्याने भिक्षा मागायला भाग पाडलं. कधी पंढरपूर, तर कधी आळंदी देवाची अशी वारी करीत दिवस मोजतेय. आता चालणं होत नाय. शरीर थकलंय म्हणून सारसबाग गणपती मंदिरासमोर बसून अक्षरश: भीक मागण्याची वेळ माझ्यावर आली आहे!’
70 वर्षीय वृद्धा अनुसया पाटोळे यांच्यावर खासगी सावकारीमुळे उद्ध्वस्त होण्याची वेळ आली आहे. सारसबागेतील श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला नियमित येणाऱ्या एका भाविकामळेमाणुसकीला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली आहे. या महिलेला कोठेतरी बघितले आहे, हे या भाविकाला जाणवत होते. अखेर न राहवून त्याने महिलेकडेच विचारणा केली. त्यावेळी तिच्या अणूंचा बांध फुटला. त्याने आजीला खडक पोलीस ठाण्यात नेले. अधिकाऱ्यांना माहिती दिल्यानंतर सावकाराला बेड्या घातल्या. दिलीप विजय वाघमारे (रा. गंज पेठ) असे अटक केलेल्या सावकाराचे नाव आहे.
नवऱ्याच्या मृत्यूनंतर अनुसया महापालिकेत अनुकंपा तत्त्वावर सफाई कामगार होत्या. त्यांची सफाई कामगार दिलीप वाघमारे याच्यासोबत ओळख झाली होती. सेवानिवृत्त झाल्यानंतर अनुसया यांनी नातीच्या उपचारांसाठी दिलीपकडून 10 टक्के व्याजाने 40 हजार रुपये घेतले. त्याबदल्यात त्याने आजीचे पासबुकसह एटीएम कार्ड घेतले. दरमहिन्याला येणाऱ्या 17 हजार रुपये पेन्शनमधील फक्त दीड हजार रुपये तो अनुसया यांना देत होता. मागील पाच वर्षांत त्याने आठ लाख रुपये उकळले, तरीही अजून मुद्दल आणि व्याज फिटले नसल्याचे सांगून लूट सुरूच ठेवली. आजीने याबाबत तिच्या दोन मुलींना सांगूनही काही फायदा झाला नाही.
पेन्शनमधील अवघ्या दीड हजारात घरखर्च भागविताना अनुसया यांची ओढाताण झाली. राहण्या-खाण्यासह औषधपाण्यासाठी पैसे कमी पडू लागले. नवऱ्याची व स्वत:ची पेन्शन व्याजापोटी सावकार वाघमारे हडप करीत होता. त्यामुळे आजीवर उपासमारीची वेळ आली.
कोणताही पर्याय नसल्याने तिने सारसबाग गणपतीसमोर भीक मागणे सुरु केले. त्यावेळी दररोज दर्शनासाठी येणाऱ्या एका भल्या माणसाने तिची व्यथा ऐकून खडक पोलीस ठाण्यात माहिती दिली. घटनेचे गांभीर्य ओळखून वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक वाय. पी. सूर्यवंशी यांनी तत्काळ आरोपीला बेड्या ठोकल्या. या वृद्धेच्या मदतीला ‘श्रीहरी’ धावल्याची चर्चा रंगली. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक पोलीस आयुक्त सतीश गोवेकर, वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट,पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, पोलीस उपनिरीक्षक यशपाल सूर्यवंशी, श्रीकांत तुळसुलकर, महेंद्र कोलते, मुसा पठाण, बलटू घाडगे यांनी केली.
सावकाराने गरीब लोकांची गरज ओळखून बेकायदेशीर व्याजाचा धंदा केल्याचे उघडकीस आले. अशा प्रकारे व्याजाची रक्कम वसूल केली असल्यास नागरिकांनी खडक पोलीस ठाण्यात संपर्क करावा.’
– श्रीहरी बहिरट वरिष्ठ पोलीस निरीक्षक खडक ठाणे
































































