
अद्ययावत एआय तंत्रज्ञानाच्या बाता मारणाऱया महायुती सरकारला राज्यात कुपोषणामुळे होणारे मृत्यू रोखता आलेले नाहीत. राज्यात मेळघाट व अन्य भागांमध्ये गेल्या पाच महिन्यांत 78 बालकांचा कुपोषणामुळे मृत्यू झाल्याची कबुली सरकारने विधान परिषदेत दिली. भाजप आमदार उमा खापरे यांनी विधान परिषदेत अर्धा तास चर्चेच्या माध्यमातून या मुद्दय़ाकडे लक्ष वेधत कुपोषण रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली. दरम्यान, कुपोषण रोखण्यासाठी महिला व बालविकास, आरोग्य, आदिवासी विकास या संबंधित विभागांची टीम तयार करण्यात येईल, असे महिला व बालविकासमंत्री अदिती तटकरे यांनी सांगितले.































































