
सियाचीन ग्लेशियरचे ध्येय गाठल्यानंतर दिव्यांगांची हीच टीम आता मालदिवच्या समुद्रात स्कुबा डायविंग आणि दुबईमध्ये पॅराजम्पिंग करून आणखी दोन विश्वविक्रम नावावर करण्याच्या तयारीत आहे.
अलीकडेच दिव्यांगांनी टोकियो पॅराऑलिम्पिकमध्ये 19 पदके जिंकून नवीन रेकॉर्ड प्रस्थापित केला. त्यानंतर आता दिव्यांगांच्या टीमने पुन्हा एकदा देशवासीयांची मान अभिमानाने उंचावेल अशी कामगिरी केली आहे. देशातील आठ दिव्यांगांनी सियाचीन ग्लेशियरच्या 15 हजार 632 फूट उंचीवर पोहोचून जागतिक विक्रम केला. याबद्दल त्यांच्यावर काैतुकाचा वर्षाव होत आहे.
ऑपरेशन ब्लू फ्रीडम मोहिमेंतर्गंत काही दिव्यांगांनी सियाचीन शिखर सर करण्याचे ध्येय ठेवले. त्यांच्या टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी ‘कॉन्कर लँड एअर वॉटर’ म्हणजेच सीएलएडब्ल्यूवर जबाबदारी सोपवण्यात आली.
सियाचीन… जगातील सर्वात उंचीवरील युद्धभूमी अशी या ठिकाणाची ओळख आहे. तिथे तापमान शून्य ते 50 डिग्री सेल्सियस इतके कमी असते. वेगाने वाहणारे वारे, हाडे गोठवणारी थंडी, बर्फाच्छादित पर्वतरांगा, हिमनद्या यांच्याशी झुंज देत दिव्यांगांच्या टीमने 1 सप्टेंबर रोजी सियाचीन बेस कॅम्पपासून मोहिमेला सुरुवात केली. तत्पूर्वी त्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य सशस्त्र दलाच्या दिग्गजांच्या चमूने म्हणजेच सीएलएडब्ल्यूने केले. स्काय डाईविंग, स्कुबा डायविंग आणि गिर्यारोहणाचे प्रशिक्षण दिव्यांगांना देण्यात आले. सुरुवातीला सियाचीन ग्लेशियर चढाईसाठी 20 दिव्यांगांना निवडण्यात आले होते. मात्र अंतिम टीममध्ये आठ जणांची निवड करण्यात आली.

























































