
सोशल मीडियावर एका आजीबाईंचा व्हिडियो व्हायरल होत आहे. वयाच्या 80व्या वर्षी आजीबाई कष्ट करून पोट भरताना दिसत आहेत. हा व्हिडियो पंजाबच्या अमृतसर शहरातील असल्याचे समजते. आजींचा ज्यूसचा स्टॉल आहे. ज्यूस विकून त्या उदरनिर्वाह करत आहेत. एवढे काबाडकष्ट करून त्यांच्या चेहऱ्यावरील हसू कायम आहे.
नेटीजन्सनी व्हिडियोला कॅप्शन देताना म्हटलंय, ‘‘आजी वृद्धापकाळात आपले पोट भरण्यासाठी काम करत आहे. ती काही वेळापासून ग्राहकांची वाट पाहत आहे. आजीचा स्टॉल उप्पल न्युरो हॉस्पिटलजवळ राणी दा बागेत आहे. कृपया त्यांच्या स्टॉलला भेट द्या. जेणेकरून काही पैसे त्यांना मिळतील.’’
अरीफ शहा नावाच्या ट्विटर युजरने व्हिडियो शेअर केला आहे. राष्ट्रीय स्तरावरील गोल्फर जस्मीन दुग्गल यांनीही हा व्हिडियो शेअर केलाय. दिग्दर्शक मधुर भांडारकर यांनीदेखील रिट्विट केले आहे. जस्मीन दुग्गलनेही लिहिलंय, ‘‘अमृतसरच्या प्रिय मित्रांनो, आजीच्या स्टॉलवर थांबा आणि त्यांना त्यांचे पोट भरण्यासाठी हातभार लावा.’’



























































