पुण्यात पाटील इस्टेट येथे आगीचे तांडव, 90 संसारांची राखरांगोळी

42

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे-मुंबई महामार्गावरील पाटील इस्टेट झोपडपट्टीमध्ये आगीच्या तांडवात 90 कुटुंबांच्या संसाराची राखरांगोळी झाली. एकामागे एक होणाऱया 30 सिलिंडरच्या स्फोटांमुळे घराच्या पत्र्यांसह आतमधील कपडे, संसारोपयोगी वस्तू, दागिने, पैशांची राख झाली. हजारो रहिवासी बेघर झाले. सुदैवाने या अग्नितांडवात जीवितहानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी सुमारे चार तास परिश्रम करून आग आटोक्यात आणली. स्थानिक तरुणांनीही शेकडोंच्या संख्येने सिलिंडर घराबाहरे काढून ते रस्त्यावर आणल्याने मोठी दुर्घटना टळली. दरम्यान, ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचे बोलले जात असले तरी त्याबाबत स्पष्टता आलेली नाही.

जुन्या पुणे-मुंबई रस्त्यावर संगमवाडी पुलाच्या शेजारी पाटील इस्टेट झोपडपट्टी आहे. अतिशय दाट लोकवस्ती असलेल्या झोपडपट्टीमध्ये 10 गल्ल्या आहेत. यात सुमारे 1200 झोपडय़ांमध्ये अडीच हजार रहिवासी आहेत. बुधकारी दुपारी एकच्या सुमारास गल्ली क्रमांक तीनमधील एका झोपडीत आग लागली. हा हा म्हणता ही आग भडकल्याने शेजारच्या सर्व झोपडपट्टय़ा या आगीच्या चपेटय़ात आल्या. गल्ली क्रमांक तीनपासून सुरू झालेली ही आग सातपर्यंत पोहचली. या वेळेत घरातील महिला, लहान मुले पळत रस्त्यावर आली. जे सावध होते ते घरातील कपडे, टीव्ही, भांडीकुंडी, फ्रीज यांसह पैसे, दागिने घेऊन बाहेर आले; परंतु बहुतांश नागरिकांचे संसार जळून खाक झाले. कामानिमित्त बाहेर पडलेल्यांना झोपडीतील वस्तू बाहेर काढता आल्या नाहीत.

अग्निशमन दलाला याची माहिती देण्यात आली. सुरुवातीला दोन-तीन बंब पाठविण्यात आले, मात्र आगीचे रौद्ररूप पाहून पुणे महापालिकेच्या सर्व बंबांसह पिंपरी-चिंचवड, खडकी कॅण्टोन्मेंट, पुणे कॅण्टोन्मेंट, पीएमआरडीएचे अग्निशमनचे बंद, पाण्याचे टँकर मागविण्यात आले.

फुटलेले सिलिंडर; जळालेले नोटांचे बंडल
आग आटोक्यात आल्यानंतर नागरिकांनी आपापल्या झोपडीकडे धाव घेतली. झोपडीचे वाकलेले पत्रे, घरातील सर्व सामानाची झालेली राख यामुळे नेमकी कोणाची कोणती झोपडी होती हेच कळत नव्हते. घरांची पडझड झाल्याने गल्ली क्रमांकही कळत नव्हता. जळालेल्या वस्तूंची राख, कोळसा पडलेला होता. आगीने फुटलेल्या सिलिंडरचे अवशेष, वितळलेली जर्मनची भांडी, कपाटात जळालेले पैशाचे बंडल हे दृश्य पाहून या कष्टकऱयांना त्यांचे अश्रू रोखता येत नव्हते.

आपली प्रतिक्रिया द्या