
जानेवारी ते एप्रिल या साडेतीन महिन्यांत सोलापूर शहरातून 91 दुचाकी चोरीला गेल्या आहेत. दुसरीकडे शहरातील वेगवेगळ्या नगरांमधील 23 पेक्षा अधिक घरांमध्ये चोरटय़ाने डल्ला मारला आहे. पोलिसांनी काही दुचाकी हस्तगत केल्या असून, घरफोडीतील काही संशयितांना अटक केली आहे. मात्र, अद्यापि तो सिलसिला सुरूच आहे. सोलापूर शहरात सात पोलीस ठाणी असून, त्या अंतर्गत सतराशेपर्यंत पोलीस अंमलदार त्याठिकाणी कार्यरत आहेत. सण-उत्सव, मंत्र्यांचे दौरे, आंदोलने, मोर्चावेळी आणि महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथीवेळी त्यांना बंदोबस्ताची डय़ूटी करावी लागते. त्यानंतर नियमित तपासकाम सांभाळावे लागते. त्यामुळे रात्रगस्तीसाठी अपेक्षित वेळ मिळत नाही.
दुसरीकडे सोलापूर शहरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्यादेखील अत्यल्प आहे. अनेकजण परगावी जाताना मौल्यवान वस्तू घरातच ठेवतात ही वस्तुस्थिती आहे. दरम्यान, पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले, की चोरटे त्याच्या पुढे एक पाऊल टाकत असल्याचेही अनेकदा पाहायला मिळाले आहे.
घराला सेफ्टी दरवाजा बसवलेला असतानाही तो तोडून चोरटय़ांनी सहजपणे घरात प्रवेश करून चोरी केल्याचीही उदाहरणे आहेत. दुसरीकडे काहीवेळा चोरटय़ांनी सीसीटीव्ही तोडले, तर काहीवेळा ‘डीव्हीआर’च चोरून नेला आहे. त्यामुळे चोरीच्या घटना रोखण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान असून, त्यातूनच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना वाढीस लागणार आहे.
पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी, अंमलदार आणि त्यांच्या अंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यात गुन्हे प्रकटीकरण पथक कार्यरत आहे. दुसरीकडे शहर गुन्हे शाखादेखील गुन्हेगारांना पकडून तपासाचे काम करते. अडचणीतील नागरिकांच्या मदतीसाठी 112 हेल्पलाइनदेखील असून, त्यासाठी वे0गळी यंत्रणा कार्यरत आहे. शहरात कमी-अधिक प्रमाणात रात्रगस्तदेखील असते. तरीदेखील चोरी, गुन्हेगारी अपेक्षेप्रमाणे कमी झालेली नाही.
























































