मुंबईसाठी ‘पॉझिटिव्ह’ बातमी; कोरोनाबाधित 94 टक्के रुग्णांची प्रकृती ठणठणीत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
corona

मुंबईत कोरोना नियंत्रणात येत असताना पॉझिटिव्ह रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होण्याचे प्रमाणही वाढल्याचे समोर आले आहे. सद्यस्थितीत एकूण 16 हजार 524 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नसलेल्या 9 हजार 614 रुग्णांसह सौम्य लक्षणे असलेल्या 5 हजार 961 रुग्णांचीही प्रकृती ठणठणीत आहे, तर 949 जणांची प्रकृती क्रिटिकल असली तर त्यांच्यावर आवश्यक उपचार सुरू असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

पालिकेच्या माध्यमातून कोरोना रोखण्यासाठी केल्या जाणाऱ्या प्रयत्नांमुळे मुंबईत कोरोना आटोक्यात आला असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90 टक्क्यांवर गेले आहे. आतापर्यंत 2 लाख 35 हजार 207 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत, तर रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने आणि रुग्ण आढळण्याचे प्रमाण कमी झाल्याने संपूर्ण मुंबईत रुग्ण दुपटीच्या कालावधीने 200 दिवसांचा टप्पा पार केला आहे.

मुंबईत मार्चमध्ये शिरकाव केलेल्या कोरोनाला रोखण्यासाठी संपूर्ण मुंबईत कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आली. वाढत्या रुग्णसंख्येमुळे ही संख्या तब्बल 550 वर पोहोचली. मात्र आता रुग्णसंख्या आटोक्यात आल्यामुळे तब्बल 490 कोरोना हेल्थ सेंटर बंद करण्यात आली असून 60 केंद्रे सुरू असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

शेकडो व्हेंटिलेटर, आयसीयू, ऑक्सिजन बेड रिक्त
घटणारी रुग्णसंख्या आणि रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढल्याने कोरोना केअर सेंटरमधील 33020 बेडपैकी तब्बल 20273 बेड म्हणजेच 61 टक्क्यांहून जास्त बेड सध्या रिक्त आहेत. शिवाय 682 आयसीयू, 5 हजार 657 ऑक्सिजन बेड आणि 295 व्हेंटिलेटर बेड सध्या रिक्त असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.