
दिलीप जाधव । खेड
खेड नगरपालिकेच्या रुग्णालयात सध्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची वाणवा असल्याने गेली अनेक वर्षे खेड शहरासह आजुबाजुच्या परिसरातील रुग्णांसाठी संजीवनी ठरलेले नगरपालिकेचे रुग्णालय सध्या अखेरची घटका मोजत आहे. काही वर्षांपुर्वी महिन्याला सुमारे ४० प्रसुती होणाऱ्या सुतिकागृहाच्या भिंतींना गेल्या काही वर्षात नवजात अर्भकाच्या रडण्याचा आवाज ऐकायला मिळालेला नाही.
खेड- दापोली मार्गावर असलेले खेड नगरपालिकेचे रुग्णालय खेड शहरासह तालुक्यातील रुग्णांसाठी हक्काचे उपचार केंद्र होते. या ठिकाणी होणारे उपचार अतिशय कमी पैशात होत असत त्यामुळे रुग्णालयाच्या व्हरांड्यात नेहमीच रुग्णांची रांग लागलेली पहावयास मिळत असे. दरदिवशी या रुग्णालयात किमांना शंभर ते दिडशे रुग्णांवर उपचार केले जात असत. महामार्गावर एखादा अपघात झाला तर अपघातातील जखमी रुग्णांसाठीही खेड नगरपालिकेचे रुग्णालय संजिवनी ठरत असे.
मात्र गेल्या काही वर्षात या रुग्णालयाचे चित्र पुर्णपणे बदलूनच गेले आहे. रुग्णांना नवसंजिवनी देणारे शासकिय रुग्णालयच सध्या व्हेंटिलेटरवर आहे. नगरपालिका आरोग्य विभागाकडून होत असलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे या रुग्णालयाची अतिशय दयनिय अवस्था झालेली आहे. दरदिवशी शेकडो रुग्णांवर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची अशी अवस्था का झाली हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता मिळालेली माहिती धक्कादायक आहे. गेल्या काही वर्षात रुग्णालयातून जे कर्मचारी निवृत झाले त्या कर्मचाऱ्यांच्या जागी नवीन कर्मचारीच भरती केले जात नसल्याने रुग्णालयात कर्मचाऱ्यांची कमतरता आहे.
आरोग्य अधिकाऱ्यांबाबतही तीच बोंब आहे. गेले काही महिने या रुग्णालयात पुर्ण वेळ वैद्यकिय अधिकारीच नव्हता. त्यामुळे रुग्णांवर उपचार करणार कोण? हा प्रश्न निर्माण झाला होता. रुग्णालयात वैद्यकिय अधिकारीच नसल्याने रुग्णही रुग्णालयात येईनासे झाले आहेत. दोन वर्षांपुर्वी ज्या रुग्णालयाची ओपीडी दिवसा १०० ते १५० इतकी होती त्या रुग्णालयात सध्या दहा रुग्ण अपवादाने पहावयास मिळतात.
या ठिकाणी असलेल्या सुतिकागृहाची अवस्थाही दयनिय आहे. पुर्वी या ठिकाणी महिन्याला किमान ४० गरोदर महिलांच्या प्रसुती आणि तितक्याच नसबंदी शस्त्रक्रिया होत असत. मात्र सद्यस्थितीत हे सुतिकागृह पुर्णपणे बंद पडले आहे. सुतिकागृहामध्ये असलेल्या तीन आया निवृत झाल्यावर त्यांच्या जागी नवीन आयांची नियुक्तीच करण्यात आली नाही.
नगरपालिकेचे हे सुसज्ज रुग्णालय आणि सुतिकागृह केवळ कर्मचाऱ्यांच्या नेमणुकीअभावी आणि नगरपालिका प्रशासनानच्या दुर्लक्षामुळे शेवटची घटका मोजत आहे. सद्यस्थितीत या रुग्णालयात एक वैद्यकिय अधिकारी पुर्णवेळ काम करत आहेत परंतु या रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांची संख्याच रोडावली असल्याने नगरपालिकेचे रुग्णालय असून नसल्यासारखे आहे.
































































