
सामना ऑनलाईन । मुंबई
एकीकडे आहे ती रेल्वेसेवाच मुंबईकरांच्या जिवावर उठली असताना दुसरीकडे सरकार वेगवान बुलेट ट्रेनचे स्वप्न दाखवत आहे. एल्फिन्स्टन दुर्घटनेनंतर पुन्हा एकदा अंधेरी स्थानकात पादचारी पूल कोसळल्याने मुंबईकरांच्या संतापाचा कडेलोट झाला. आम्हाला बुलेट ट्रेन नको, त्यापेक्षा आहे ती रेल्वेसेवा सुरक्षित करा, असे मुंबईकरांनी ट्विटरवरून सरकारला सुनावले.
रेल्वेच्या पुलांची डागडुजी करा
मुंबईत बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा ज्या लोकल आहेत आणि जे पादचारी किंवा रेल्वेचे पूल आहेत त्यांची आधी डागडुजी करा किंवा मोडकळीस आलेले पूल तोडून पुन्हा नव्याने बांधा.
- संतोष सागवेकर
महागडय़ा बुलेट ट्रेनची गरज नाही
मुंबई ते अहमदाबाद ही जॉयराइड आमच्यासारख्या सर्वसामान्य प्रवाशांसाठी नाहीच. त्यामुळे बुलेट ट्रेन आणण्यापेक्षा रेल्वेचे पादचारी पूल, ज्या ठिकाणी प्रचंड गर्दी असते असे पूल यांच्या मजबुतीची खात्री द्या.
- सॅमी सरकार
निवडणुकीच्या फोटोसेशनसाठी बुलेट ट्रेन आणाच
बुलेट ट्रेन बांधाच. मुंबईकरांसाठीच्या सोयीसुविधा विसरून जा. कारण लोकल सर्वसामान्य मुंबईकरांसाठी आहेत. जर बुलेट ट्रेन आणाल तर निवडणुकीसाठी कडक बॅकग्राऊंड फोटोसेशन करता येईल. त्यामुळे मोदीजी, बुलेट ट्रेन आणाच…
- किरण कुमार
सुरक्षित रेल्वे प्रवासाची हमी द्या
आम्हाला बुलेट ट्रेन नको. या दोन्ही गाष्टींसाठी पाण्यासारखा पैसा खर्च करण्यापेक्षा मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेली लोकलसेवा सुरक्षित करा. सुरक्षित रेल्वे प्रवासाची हमी द्या.
- गौतम जोशी
चुकीची स्वप्नं दाखवू नका
आम्हाला चुकीची स्वप्नं दाखवू नका. मुंबईतल्या लोकलमध्ये प्रचंड गर्दी असते. त्या प्रवाशांनी खचाखच भरून जातात. ही गर्दी आधी कमी करा. मुंबईतला लोकल प्रवास आधी सुरक्षित करा.
- फिरदौस खत्री
‘मुंबईकडून फक्त घेतले जाते!’
मुंबईकडून आणि मुंबईकरांकडून फक्त घेतले जाते. लोकसंख्येच्या तुलनेत मुंबईला पैशाच्या आणि इतर सुविधांच्या बाबतीत फारच कमी परत मिळते, अशी संतप्त प्रतिक्रिया अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी अंधेरी रेल्वे पूल दुर्घटनेनंतर व्यक्त केली.
‘ही नैसर्गिक आपत्ती नव्हती. टाळता येण्यासारखी दुर्घटना होती. मुंबईकरांमध्ये स्पिरिट आहे. आहे त्या परिस्थितीत मुंबईकर पुढे जात असतात. त्यांच्याकडे दुसरा पर्याय नसतो. मात्र, प्रशासकीय यंत्रणा आपली जबाबदारी झटकतात, हे जास्त भयंकर आहे,’ असे त्या म्हणाल्या. अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे ही आपत्ती ओढवली आहे. एलफिन्स्टन पुलाच्या दुर्घटनेनंतरही यंत्रणा धडा घेत नसतील तर हे वाईट आहे, असेही त्या म्हणाल्या.























































