
सामना, प्रतिनिधी रत्नागिरी
‘आंब्याच्या फांदीवर बसलाय मोर…भाजप सरकार जमीनचोर’, ‘एकच जिद्द रिफायनरी रद्द’, ‘एक दो एक दो भाजप सरकार फेक दो’, ‘रिफायनरी हटाव…कोकण बचाव’, ‘जमीन आमच्या हक्काची’ नाही कुणाच्या बापाची’, ‘शिवसेना झिंदाबाद…’ अशा घोषणांनी आज नाणार परिसर दुमदुमून गेला. भाजप सरकार रिफायनरी प्रकल्प कोकणवासीयांच्या माथी मारण्याचा प्रयत्न करत असताना शिवसेनेने आज भरपावसात संघर्षयात्रा काढून प्रकल्प हद्दपार करण्याचा निर्धार केला. वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची तमा न बाळगता शेतकरी, मच्छीमार आणि शिवसैनिक रस्त्यावर उतरले. ग्रामस्थांचा विरोध डावलून रिफायनरी प्रकल्प रेटणाऱ्या भाजप सरकारच्या विरोधात प्रचंड संताप आज संघर्षयात्रेत दिसून आला.
शिवसेना सचिव-खासदार विनायक राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने आज संघर्षयात्रा काढली. डोंगर तिठा येथून दुपारी १२ वाजता संघर्षयात्रेला सुरुवात झाली. राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात घोषणा देत सुमारे तीन किलोमीटर ही संघर्षयात्रा निघाली. भगवे झेंडे, भगव्या टोप्या आणि हातामध्ये रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे फलक घेत संघर्षयात्रा सुरू झाली. संघर्षयात्रेच्या वेळी पोलीस बंदोबस्तही मोठय़ा प्रमाणात होता.
































































