
सामना प्रतिनिधी । मुंबई
हिट अँड रन प्रकरण तसेच काळविटाच्या शिकार प्रकरणानंतर अभिनेता सलमान खान पुन्हा एकदा कायद्याच्या कचाटय़ात सापडला आहे. यावेळी पनवेलच्या फार्महाऊसचे प्रकरण समोर आले आहे. पनवेलच्या फार्महाऊसची जमीन २००३ साली पर्यावरणाच्यादृष्टीने घोषित झालेली आहे. मात्र असे असतानाही सलमानने त्यावर बांधकाम सुरू केले आहे. याप्रकरणी त्याला वन विभागाने कारणेदाखवा नोटीस बजावली आहे.
वजापूर येथे अर्पिता फार्म नावाचे सलमानचे फार्महाऊस आहे. तिथे बांधकाम सुरू आहे. हा भाग इको सेन्सिटीव्ह क्षेत्रात येतो. सलमानने नियमबाह्य बांधकाम सुरू केल्याने त्यावर राज्य सरकारने ३ एप्रिल २०१७ रोजी बंदी आणली. सलमान सध्या चित्रपटाच्या शूटींगसाठी बाहेरगावी आहे. त्याचे वडील सलीम खान यांनी हे प्रकरण म्हणजे निव्वळ आरोप असल्याचे सांगत योग्यवेळी खुलासा करू, असे सांगितले आहे. सलमानच्या कुटुंबाला नोटीस बजावल्यानंतर ११ दिवसांत वनअधिकारी एस. एस. कापसे यांची बदली झाल्याचेही समजते.



























































