अरपिंदर, स्वप्नाची सुवर्णझेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जकार्ता

इंडोनेशिया येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत अकराव्या दिवशी अखेर हिंदुस्थानच्या खात्यात दोन सुवर्णपदकाची भर पडली. तिहेरी उडीत अरपिंदर सिंहने तब्बल 48 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर हिंदुस्थानला सुवर्णपदक जिंकून दिले. त्यानंतर स्वप्ना बर्मनने ऍथलेटिक्सच्या हेप्टॅथलॉन प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली.

स्पर्धेत बुधवारी हिंदुस्थानने दोन सुवर्ण, एक रौप्य आणि एक कास्यपदकाची कमाई केली. याचबरोबर पदकतालिकेत नवव्या स्थानावर असलेल्या हिंदुस्थानच्या खात्यात आतापर्यंत 11 सुवर्ण, 20 रौप्य व 23 कास्य अशी एकूण 54 पदके जमा झाली आहेत.

अरपिंदर सिंहने अंतिम फेरीतील तिसऱ्या प्रयत्नांत 16.77 मीटर तिहेरी उडी मारुन सुवर्णपदकाला गवसणी घातली. उझबेकिस्तानच्या कुर्बानोव रुसलानने 16.62 मीटर उडी मारून रौप्यपदकाची कमाई केली. चीनचा साओ शू हा 16.56 मीटर कामगिरीसह कास्यपदकाचा मानकरी ठरला. याच प्रकारात हिंदुस्थानचा राकेश बाबूही अंतिम फेरीत दाखल झाला होता, मात्र पदकांच्या शर्यतीत त्याला आव्हान राखता आले नाही. अरपिंदरचाही पहिला प्रयत्न फाऊल झाला. दुसऱ्या प्रयत्नात त्याने 16.58 मीटर उडी मारली. तिसऱ्या प्रयत्नांत 16.77 अशी कामगिरी उंचावली. त्याच्या या कामगिरीपर्यंत इतर प्रतिस्पर्ध्यांना जाता आले नाही.

जबरदस्त प्रदर्शन; पहिलेच गोल्ड

स्वप्ना बर्मन हिने ऍथलेटिक्समधील हेप्टॅथलॉन प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. हिंदुस्थानचे हे या खेळातील पहिले सुवर्ण ठरले. यामध्ये सात प्रकारांचा समावेश असतो. यात 200 मी. आणि 800 मी. धावण्याची शर्यत होते. त्याचबरोबर 100 मी. अडथळ्य़ाची शर्यत खेळवली जाते. त्यानंतर उंच उडी, लांब उडी, गोळाफेक आणि भालाफेक या प्रकारांचा समावेश असतो. स्वप्नाने 6026 गुणांसह ‘सुवर्ण’भरारी घेतली. तिने 100 मीटर शर्यत 981, उंच उडीत 1003, गोळाफेकमध्ये 707, 200 मीटर शर्यतीत 790, लांब उडीमध्ये 865, तर भालाफेकीमध्ये 872, 800 मीटर शर्यतीत 808 गुणांची कमाई केली.

दोनशे मीटर शर्यतीत द्युती चंदला रौप्य

हिंदुस्थानची धाकपटू द्युती चंद हिने आशियाई क्रीडा स्पर्धेतील 200 मी. शर्यतीतही रौप्यपदकाची कमाई केली. 100 मीटर शर्यतीत .02 सेकंदाच्या फरकाने द्युतीला रौप्यपदकावर समाधान मानावे लागले होते. या स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक होय. द्युती चंदने 23.20 सेकंद वेळेसह रौप्यपदकाला गवसणी घातली. बहरीनच्या ओदिओंग इदिदिओंग हिने 22.96 सेकंद वेळेसह सुवर्णपदक जिंकले. चीनची वेई योंगली ही 23.27 सेकंद वेळेसह कास्यपदकाची मानकरी ठरली.