
सामना प्रतिनिधी । चिरनेर
आदिवासी समाज हातावर कमावतो आणि आपल्या दैनंदिन गरजा भागवतो. त्यामुळे नेहमीच त्यांना उद्याची भ्रांत असते. पर्यायाने दिवाळी सारखे सण साजरे करणे त्यांना शक्य नसल्याने शिवसैनिकांनी ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून उरण तालुक्यातील दोन दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन तेथील आदिवासींना दिवाळीचा गोड घास भरवून त्यांच्या जीवनात एक आनंदाचा क्षण आणला.
उरण तालुक्याच्या पूर्व विभागातील डोंगर कपारीत दुर्गम ठिकाणी केळाचा माळवाडी व बेलवाडी हे आदिवासी पाडे वसले आहेत. जंगलात रानोमाळ भटकून लाकडाच्या मोळ्या गोळा करायच्या आणि त्या दूरच्या गावांमध्ये विकून आपल्या पोटाची भूक भागवायची. हा येथील आदिवासींचा दिनक्रम! कधी लाकडाची मोळी विकली नाही तर उपास ठरलेला, अशी आर्थिक स्थिती या आदिवासींची असल्याने यावर्षीची त्यांची दिवाळी गोड करण्याचा संकल्प शिवसैनिकांनी केला. शिवसेनेचे रायगड जिल्हा ग्राहक संरक्षण कक्ष प्रमुख रमेश म्हात्रे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेंद रहाळकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी केळाचा माळ व बेलवाडी या दुर्गम आदिवासी पाड्यांवर जाऊन त्या आदिवासी बांधवांसह दिवाळीचा फराळ केला. त्याचबरोबर घराघरात फराळाचे तसेच आदिवासी मुलांना फटाक्यांचे वाटप केले.
या दुर्गम आदिवासी पाड्यांवर कोणीही या आदिवासींबरोबर कुठलाही सण साजरा केला नव्हता. त्यामुळे कोणीतरी पहील्यांदा आपल्याला प्रेमाचा गोड घास भरवायला आल्याचे बघून येथील आदिवासी गहिवरून गेले होते. येथील आदिवासींच्या समस्या शिवसेनेच्या माध्यमातून दूर करण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे जिल्हा कक्ष प्रमुख रमेश म्हात्रें यांनी येथील आदिवासींना दिला. यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, महिला तालुका संघटक सुजाता गायकवाड, गजानन माळी, तलरेजा, धिरज बुंदे, शिक्षक सेनेचे कौशिक ठाकूर, पंकज सुतार, केशव यादव आदी पदाधिकारी व मोठ्या प्रमाणात शिवसैनिक सहभागी झाले होते.
































































