
सामना ऑनलाईन। नवी दिल्ली
देशाची राजधानी असलेली नवी दिल्ली पुन्हा एकदा हादरली आहे. येथे रस्त्यावर आईच्या कुशीत झोपलेल्या दीड वर्षाच्या चिमुरडीला पळवून नेत एका नराधमाने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला रेल्वे रुळाच्या बाजूला बांधून त्याने तिथून पळ काढल्याची भयंकर घटना घडली आहे. मुलीची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर उमटले असून आरोपीला फासावर लटकवण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याप्रकरणी अनिल (24) नामक तरुणास अटक करण्यात आली आहे.
पीडित मुलगी तिच्या आईबरोबर रस्त्यावर राहते. शुक्रवारी मध्यरात्री ती आईच्या कुशीत झोपलेली असताना ड्रग्जच्या अंमलाखाली असलेल्या अनिलची नजर तिच्यावर पडली. मुलीची आई गाढ झोपेत असल्याचे बघून त्याने मुलीला अलगद उचलले व रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला नेले. तिथे त्याने तिच्यावर बलात्कार केला. मुलगी रडू लागल्याने त्याने तिला रेल्वे फाटकाजवळ नेले. त्यानंतर तिला रेल्वे रुळाच्या बाजूला बांधून त्याने तिथून पळ काढला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून बाजूच्या झोपडपट्टीतील काहीजणांनी रुळाच्या दिशेने धाव घेतली. नंतर पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी मुलीला रुग्णालयात दाखल केले.
तपासादरम्यान रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये अनिलनेच मुलीचे अपहरण केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी अनिलला अटक केली. सोशल मीडियावर या घटनेची माहिती व्हायरल होताच आंतरराष्ट्रीय स्तरावरही अनेकांनी या घटनेचा निषेध केला. तसेच आरोपीला फासावर लटकवा अशी मागणीही अनेकजणांनी केली आहे.
दरम्यान सकाळी उठल्यावर मुलगी बाजूला नसल्याचे बघून तिच्या आईने पोलिसात मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. तेव्हा मुलगी रुग्णालयात असल्याचे पोलिसांनी तिला सांगितले.



























































