अवकाळी पावसाचा ‘इफ्फी’ला फटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, पणजी

सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात ‘इफ्फी’ला बसला आहे. आज दुपारी अचानक पावसाने हजेरी लावल्यामुळे सगळय़ांची धांदल उडाली. आयनॉक्स परिसरातील सजावट आणि रेड कार्पेटवर पावसाचे पाणी साचल्याने प्लॅस्टिक घालून झाकून ठेवण्याची वेळ आयोजकांवर आली.

दुपारी पावणेदोनच्या सुमारास वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. मॅकेनिझ पॅलेसशेजारी रंगीत कापडी पताका लावून उभारलेला मंडप बघताक्षणी जमीनदोस्त झाला. सिनेमातील तारे-तारकांसाठी अंथरलेल्या रेड कार्पेटवरदेखील पावसाने पाणी फेरल्यामुळे रेड कार्पेट प्लॅस्टिकने झाकून ठेवावी लागली. झारखंड पर्यटन खात्यातर्फे उभारल्या जात असलेल्या स्टॉललादेखील प्लॅस्टिकने झाकावे लागले. ‘इफ्फी’च्या लोगोची इंस्टॉलेशनदेखील पावसामुळे प्लॅस्टिकने झाकून ठेवावी लागली आहेत. उद्घाटन सोहळा इनडोअर स्टेडियममध्ये होणार असल्याने आयोजकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. पाऊस असाच सुरू राहिला तर थिएटरबाहेरील उपक्रम करणे शक्य होणार नाही. जॉगर्स पार्कमध्ये मोकळय़ा मैदानावर खेळाचे चित्रपट दाखवले जाणार आहेत. त्यासाठी उभारलेला स्क्रीनदेखील पावसाने भिजून गेला आहे.

49 व्या  हिंदुस्थानी आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा 2018 मध्ये फिचर (कथाधारित) आणि नॉन-फीचर (कथाबाह्य) चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. फीचर फिल्म ज्यूरींनी शाजी एन. करुण दिग्दर्शित चित्रपट ‘ओलू’ हिंदुस्थानी पॅनोरामा 2018 विभागाच्या शुभारंभाचा चित्रपट म्हणून निवडला आहे तर कथाबाह्य चित्रपट म्हणून आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘खरवस’ या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.