माथेरानच्या राणीला लवकरच एसीचा डबा जोडणार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

माथेरानच्या प्रसिद्ध मिनी ट्रेनला अखेर वातानुकूलित डबा लावण्याची तयारी पूर्ण झाली असून असा एसी कोच बनवून तयार करण्यात आला आहे. त्यामुळे लवकरच या एसी कोचचे भाडे निश्चित करण्यात येणार असून पर्यटकांना घाटमाथ्यापर्यंत थंडगार प्रवास करता येणार आहे.

बच्चे कंपनीमध्ये प्रसिद्ध असलेली माथेरानची मिनी ट्रेन ‘माथेरानची राणी’ आणखीन आरामदायी करण्याचे मध्य रेल्वेचे प्रयत्न सुरू आहेत. या मिनी ट्रेनला वातानुकूलित कोच बसविण्याची मागणी पुढे आली होती. त्यासाठी सोलापूरच्या कुर्डूवाडी येथे नवीन डबे तयार करण्यात आले आहेत.

16 प्रवासी बसण्याची व्यवस्था
या ट्रेनला सध्या सहा डबे जोडण्यात आलेले आहेत. त्याला आता आठ डबे जोडण्याची तयारीही करण्यात येत आहे. नव्या वातानुकूलित डब्यात 16 प्रवाशांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या एका डब्याला 1.5 टन क्षमतेचे दोन एसी बसविण्यात आले आहेत. या एसीला 750 केव्ही क्षमतेच्या जनरेटरने वीज पुरविली जाणार आहे. या एसी डब्याचे भाडे अद्यापि निश्चित करण्यात आलेले नसले तरी 300 ते 500 रुपयांच्या दरम्यान ते असणार आहे.

‘विस्टाडोम’ डबा बसविण्याचीही तयारी
माथेरानच्या राणीला पारदर्शक काचेचे ‘विस्टाडोम’ डबे बसविण्याची ही योजना आकार घेत आहे. नुकतेच कोकणात जाणाऱया जनशताब्दीला प्रवाशांना कोकणचे सौंदर्य न्याहाळता यावे यासाठी ‘विस्टाडोम’ डबा बसविण्यात आला आहे. कालका ते सिमला मिनी ट्रेनलादेखील पारदर्शक छताचा ‘विस्टाडोम’ कोच बसविण्यात आला आहे.