
सामना ऑनलाईन । अयोध्या
‘आता हिंदू स्वस्थ बसणार नाही, प्रश्न विचारणारच. त्यामुळे मंदिर निर्माणाची तारीख सांगा’, अशा कडक शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी श्रीराम जन्मभूमी अयोध्येतून मोदी सरकारला ठणकावलं. तसेच जर अध्यादेश आणत असाल तर शिवसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल, असं आश्वासन देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी दिलं. उद्धव ठाकरे यांच्या संवादानंतर जय श्रीराम, जय श्रीराम अशा गगनभेदी घोषणांनी केवळ लक्ष्मण किलाच नाही तर संपूर्ण अयोध्या नगरी दुमदुमून गेली.
उद्धव ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याकडे सारा देश डोळे लावून बसला होता. त्यांच्या आगमनावेळी स्वागतासाठी म्हणून अयोध्या नगरीचा कानाकोपरा सजवण्यात आला होता. उद्धव ठाकरे यांना बघता यावं यासाठी गल्लोगल्लीत प्रचंड गर्दी जमली होती. त्यांचे अयोध्येत आगमन होताच ‘जय श्रीराम’, ‘जय शिवसेना’, ‘शिवसेना झिंदाबाद’, ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’, अशा जोरदार घोषणा सुरू होत्या. उद्धव ठाकरे हे लक्ष्मण किला येथे पोहोचल्यावर त्यांनी सहकुटुंब आधी गणेश पूजन, गौरी पूजन, कलश पूजन केले. त्यानंतर साधू-संत-महंतांचे आशीर्वाद घेतले. या कार्यक्रमानंतर साधू-संत-महंताचे आभार मानण्यासाठी उद्धव ठाकरे बोलण्यास उभे राहिले, तेव्हा उपस्थित जनसमूदायासमोर उद्धव ठाकरे यांनी अयोध्येत येण्यामागची आपली भूमिका स्पष्ट केली.
‘मी रामप्रभूचे दर्शन घेण्यासाठी आलो आहे. या पुढेही असेच वारंवार येत राहीन’, असे उद्धव ठाकरे यांनी म्हणताच टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. ते पुढे म्हणाले की, ‘माझ्यावर विरोधक आरोप करत आहे की, निवडणूक आल्यावर यांना राम आठवला. पण आठवण त्याची केली जाते ज्याला आपण विसरतो. रामललाला आम्ही कसे विसरणार?’ हे बोलतानाच त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची आठवण सांगितली. (पुढे वाचत रहा…)
तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत!
ते म्हणाले की, ‘आजचा दिवस माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा आहे. मी इथे श्रेयवादाच्या लढाईसाठी आलो नाही. तर झोपलेल्या कुंभकर्णाला जागं करण्यासाठी आलो आहे. तो कुंभकर्ण सहा महिने झोपायचा.. हे कुंभकर्ण चार वर्षांपासून झोपलेत! जे आश्वासन जनतेला, हिंदूंना दिलं होतं त्याची आठवण करून देण्यासाठी आलो आहे. दिलेलं वचन पूर्ण करणं हेच आमचं हिंदुत्व आहे’, असं त्यांनी ठणकावून सांगितलं.
‘आपण सर्व एकत्र येऊन मंदिर निर्माण करू. मला कोणतंही श्रेय नको. मला मंदिर पाहीजे, असा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला. मंदिर निर्माणासाठी आणखी किती काळ घालवणार. मंदिर वही बनाएंगे, मगर तारीख नही बताएंगे, हे किती दिवस चालणार’, असा खणखणीत सवाल करत ते म्हणाले की, ‘मला मंदिर निर्माणाची तारीख हवी आहे, ती तारीख घ्यायला मी आलो आहे’.
‘मी सरकारला हे सांगण्यासाठी आलो आहे की, गेल्यावेळी माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात आलेलं सरकार हे गटबंधनवालं सरकार होतं. मात्र आताचं सरकार हे मजबूत सरकार आहे. त्यामुळे अध्यादेश आणा माझा पक्ष त्याला नक्की पाठिंबा देईल’, असा विश्वास त्यांनी दिला. तसेच श्रद्धेच्या विषयाचा निकाल न्यायालयात लागू शकत नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. राममंदिरासाठी सुप्रीम कोर्टाचे कारण पुढे करू नका, नोटाबंदी करताना सुप्रीम कोर्टाला विचारले होते काय?, असा सवाल त्यांनी यावेळी केला.
‘मंदिर निर्माण करणं साधं काम नाही. त्यासाठी छाती असली पाहिजे. फक्त छाती असून चालणार नाही तर त्यात मर्दाचं हृदय असलं पाहिजे’, असा सणसणीत टोला देखील त्यांनी यावेळी लगावला.
बोलता बोलता त्यांनी अटलजींची पुन्हा आठवण काढली आणि म्हणाले की, ”अटलजी म्हणाले होते की ‘अब हिंदू मार नही खाएगा’. तर मी म्हणतो की, आता हिंदू स्वस्थ बसणार नाही, हिंदू प्रश्न विचारणारच”, असा खणखणीत इशाराही त्यांनी सरकारला दिला. आभार प्रदर्शनाच्या समारोपावेळी त्यांनी ‘हर हिंदू की यही पुकार, पहले मंदिर फिर सरकार’ असा नारा दिला. त्याला उपस्थित जनसमूदायाने देखील जोरदार प्रतिसाद दिला. त्यानंतर ‘जय हिंद, जय महाराष्ट्र, जय श्रीराम’ म्हणत त्यांनी आपले आभार प्रदर्शनाचे शब्द पूर्ण केले.


























































