
सामना प्रतिनिधी । मालवण
माझ्यासमोरील आव्हान मी २०१४ च्या निवडणुकीतच संपविले. त्यामुळे आता २०१९ च्या निवडणूकीत माझेच आव्हान विरोधकांना आहे. विरोधकांनी विश्वास गमावल्यानेच त्यांना ‘विश्वास यात्रा’ काढावी लागत आहे, अशी टीका आमदार वैभव नाईक यांनी मालवण येथे केली.
मालवण शहरातील हॉटेल लीलांजली येथे तालुका शिवसेना कार्यकारिणीची बैठक पार पडली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, उपजिल्हा प्रमुख बबन शिंदे, उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, महिला जिल्हाध्यक्ष जान्हवी सावंत, महिला उपजिल्हा संघटक, देवयानी मसुरकर, नगरसेविका सेजल परब, नगरसेवक नितीन वाळके, पंकज सादये, युवा सेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, अंजना सामंत, दीपा शिंदे, सतीश प्रभू, विनायक परब, किराण वाळके, बाबा सावंत, अरुण लाड, शहरप्रमुख बाबी जोगी, उपशहर प्रमुख किसन मांजरेकर यांच्यासह अन्य शिवसेना पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमदार नाईक म्हणाले, जनतेचा विश्वास गमावल्यानेच स्वाभिमानला विश्वास यात्रा काढावी लागली आहे. प्रत्यक्षात नारायण राणे भाजपचे खासदार, नीतेश राणे काँग्रेसचे आमदार आणि आता ते राष्ट्रवादी सोबत जाणार असल्याची चर्चा सुरू झाल्याने ते आता जनतेला कोणता विश्वास देणार? हा मोठा प्रश्न आहे, अशी टीका करत माझ्या त्याच्या विश्वास यात्रेला शुभेच्छा आहे असे सांगितले.
मतदार संघातील अनेक विकासात्मक कामे मार्गी लावण्यात आली आहेत. यात भुयारी गटार योजना, नळपाणी योजना, बंदर जेटी, मेढा येथील मत्स्य जेटी, बसस्थानक यांसारखी कामे लवकरच मार्गी लागणार आहेत. सर्वसामान्य जनतेसह, मच्छीमारांच्या एल ईडी, पर्ससीन मासेमारी बंदी या समस्याही सोडविण्यात आल्या आहेत. मतदार संघातील प्रत्येक गावात कामे केली असल्याने मी ताठ मानेने जनतेसमोर जाऊ शकतो. येत्या निवडणुकीत विरोधकांकडून आरोप होणार आहेत. गैरसमज पसरविले जाणार आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आपल्या गावात आपली ताकद दाखवून देण्याची गरज आहे. जिल्ह्यातील अन्य तालुक्यात युवा सेनेचे काम जोरात सुरू असून या तालुक्यातही युवा सेनेने कार्यकर्त्यांची फळी उभारत जोमाने कामाला लागावे अशा सूचनाही नाईक यांनी यावेळी दिल्या. यावेळी अन्य पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.


























































