पोलिसांना एका क्लिकवर घर मिळणार, 47 अधिकाऱ्यांकडे फ्लॅटस्च्या चाव्या सुपूर्द

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत 50 हजार पोलीस आहेत आणि घरांची संख्या आहे अवघी 22 हजार 500. अर्थात ही आकडेवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिली आहे. याचाच अर्थ घर मिळवण्यासाठी (सर्व्हिस क्वार्टर) पोलिसांना किती यातायात करावी लागत असेल हे लक्षात येते. मात्र पोलिसांना आता एका क्लिकवर घर मिळणार आहे. आज 47 अधिकाऱयांना त्यांच्या सुसज्ज फ्लॅटस्च्या चाव्या मुख्यमंत्र्यांनी सुपूर्द केल्या तेव्हा ही बाब उघड झाली.

पोलीस आयुक्त सुबोधकुमार जायसवाल यांच्या पुढाकाराने पोलिसांची ‘घरघरी’तून सुटका झाली आहे. आयुक्तांनी ई-आवास ही ऑनलाइन संगणकप्रणाली उपलब्ध करून दिली असून घर कधी व कुठे मिळणार याची माहिती पोलिसांना एका क्लिकवर समजणार आहे.

सांताक्रुझमध्ये घरे
सांताक्रुझ पोलीस ठाण्याच्या शेजारीच अधिकाऱयांच्या घरांची इमारत उभारण्यात आली असून आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या इमारतीचे उद्घाटन झाले आणि 47 वरिष्ठ अधिकाऱयांना घरांच्या चाव्या सोपविण्यात आल्या. साडेआठशे स्क्वेअर फुटांच्या या घराची बाजारभावानुसार किंमत अडीच कोटींच्या आसपास आहे. एवढे महागडे घर पोलिसांना दिल्याचा आनंद मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.

विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटन
विलेपार्ले पोलीस ठाण्याच्या नवीन इमारतीचे उद्घाटनही यावेळी करण्यात आले. या इमारतीत कार्यालयाव्यतिरिक्त व्यायामशाळा, कॅण्टीन, आराम कक्ष, परिषद हॉल आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. यावेळी सहआयुक्त देवेन भारती, आशुतोष डुंबरे, संतोष रस्तोगी, विनय चौबे आदी उपस्थित होते.

अंगावर खाकी नसली तरी आपणही पोलीसच!
चित्रपटात मी अनेकदा पोलीस अधिकाऱयाची भूमिका बजावली असेन, पण वास्तव जीवनात माझ्या अंगावर खाकी नसली तरीही मी पोलीसच आहे आणि त्यामुळे माझ्या शहराच्या सुरक्षेसाठी मी सदैव चाणाक्ष व जागृत असणे गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाने आपले डोळे, कान उघडे ठेवून वावरले पाहिजे. आजूबाजूला घडणाऱया प्रत्येक बाबीचा सारासार विचार केला पाहिजे. पोलीस तर आहेतच, पण आपणही पोलीस म्हणून नेहमी जागरूक राहायला पाहिजे, असे आवाहन महानायक अमिताभ बच्चन यांनी केले.