
तुषार सूर्यवंशी । चोप़डा
चोपडा येथील पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांना गुरुवारी भाजप पदाधिकाऱ्यांनी मारहाण करून दुखापत केली होती. परिणामी भाजप पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. त्याचा बदला म्हणून राज्यातील सत्तेचा उपयोग घेत भाजपने पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील यांची बदली करवून आणली आहे. चोपड्यात राजकारण जिंकले, अधिकारी हरले अशी प्रतिक्रिया उमटत आहे.
भाजप शहराध्यक्षाकडून पोलीस निरीक्षकास मारहाण
पोलीस निरीक्षक किसनराव नजन पाटील हे ‘गुंड’ असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष उदय वाघ म्हणाले होते. तसेच त्यांच्या बदलीची मागणी देखील आपण करणार असल्याचे वाघ यांनी कालच सांगितले होते. त्याप्रमाणे आज पोलीस निरीक्षक पाटील यांची जळगाव पोलीस नियंत्रण कशात बदली झाल्याचे आदेश चोपडा शहर पोलीस ठाण्यात रात्री प्राप्त झाले आहेत. पोलीस निरीक्षक पाटील यांचा चोपड्यातील दोन वर्षांचा कार्यकाळ सर्वसामान्यांना न्याय देणारा ठरला होता. अवैध धंदे तसेच गुंडगिरी मोडून काढण्याचे काम त्यांनी आपल्या कार्यकाळात केले. एक कर्तव्यदक्ष आणि डॅशिंग पोलीस अधिकारी म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. परंतु राजकारणापुढे सर्वांचीच हार होते तशी पोलीस निरीक्षक पाटील यांच्याबाबतीत देखील घडले आहे. त्यांच्या बदलीचे वृत्त शहरात वाऱ्यासारखे पसरले. सामान्य नागरिकांनी मात्र याबाबतीत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच भाजप पदाधिकाऱ्यांनी सत्तेचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा अशी देखील चर्चा नागरिकांमध्ये आहे.



























































