
सामना प्रतिनिधी । सिंधुदुर्गनगरी
आकृतीबंध व कार्यालयीन रचना करताना राज्य संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाचा परिवहन आयुक्त कार्यालयाकडून विचार केला नसल्याचा आरोप करत संघटनेच्या प्रस्तावाचा विचार व्हावा या प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनच्या वतीने राज्यभर आज ठिय्या आंदोलन छेडण्यात आले. याचाच एक भाग म्हणून मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना सिंधुदुर्गच्या वतीने आज उपप्रादेशिक कार्यालयासमोर सकाळी १० ते १२ या वेळेत ठिय्या आंदोलन केले.
मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटना सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष सिध्देश्वर घुले यांच्या नेतृत्वाखाली आज मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांनी हे आंदोलन छेड़त आपल्या मागण्यांचे निवेदन अतिरिक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद दळवी यांच्याकडे निवेदन सादर केले. यावेळी श्रावणी मयेकर, मंगेश गायकवाड, अजय तरवाळ, गणेश कारंडे, राधा बसणकर, संजय केरकर आदि कर्मचारी उपस्थित होते.
राज्यातील परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या आकृतीबंध व कार्यालयीन रचना या महत्वाच्या मागण्या शासनस्तरावर प्रलंबित असल्याने वर्ग ३ च्या कर्मचाऱ्यांच्या भवितव्यास धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांचा आकृतिबंध व कार्यालयीन रचना कशी असावी याबाबत राज्यस्तरीय संघटनेने १६ डिसेंबर २०१६ रोजी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला होता. त्यावर तत्कालीन परिवहन आयुक्तांशी राज्य संघटनेची चर्चाही झाली होती. मात्र शासनाने तो सादर करताना संघटनेचा प्रस्ताव विचारात घेतला गेला नसल्याने ५ ऑक्टोंबर २०१७ रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा ईशारा या संघटनेने दिला होता. त्यानुसार परिवहन आयुक्तांशी झालेल्या चर्चेत सुधारीत प्रस्ताव सादरण्याच्या सुचनेनुसार आंदोलन स्थगित करत राज्य संघटनेने सुधारीत प्रस्ताव सादर केला होता. मात्र ११ सप्टेंबर २०१८ रोजी परिवहन आयुक्त कार्यालयाने आकृतीबंध व कार्यालयीन रचना बाबत शासनाकडे पाठविलेल्या प्रस्तावात राज्य संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावाचा विचार केला गेला नसल्याचा आरोप करत सिंधुदुर्ग जिल्हा मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेने आज उपप्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले.































































