ठाण्यातील 405 रुग्णालयांना फायर एनओसी नाही

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

राज्यात इमारतींसह रुग्णालयांना आगी लागण्याच्या घटना ताज्या असतानाच ठाण्यातील सुमारे 405 रुग्णालयांना फायर एनओसी नसल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेची दखल घेत हायकोर्टाने याप्रकरणी ठाणे महापालिकेला आठवडाभरात प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

ठाण्यातील 452 पैकी 405 रुग्णालयांना फायर एनओसी मिळालेली नाही याला ठाणे महापालिका जबाबदार असल्याचा आरोप करीत सपन श्रीवास्तव यांनी याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी याचिकाकर्त्यांनी आपली बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, केवळ 45 रुग्णालयांनाच फायर एनओसी देण्यात आली असून इतर रुग्णालयांना एनओसी मिळालेली नाही. न्यायालयाने हा युक्तिवाद एकून घेत प्रशासनाला खडसावले.