
सामना ऑनलाईन, मुंबई
मध्य रेल्वेची मुंबईतून सुरू होणारी नवीन तिसरी राजधानी एक्स्प्रेस मुंबईकरांच्या काही फायद्याची नसून तिच्या विचित्र वेळापत्रकामुळे ती केवळ नाशिककरांनाच उपयोगाची ठरण्याची शक्यता आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतून देशाच्या राजकीय राजधानी असलेल्या दिल्लीसाठी जाणारी तिसरी राजधानी एक्स्प्रेस लवकरच धावणार आहे. या आठवडय़ात तिची गाडीच्या मागे आणि पुढे इंजिन लावून ‘पुशपूल’ चाचणी घेण्यात येणार आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून मध्य रेल्वेची सीएसएमटी ते हजरत निजामुद्दीन ट्रेन सोडण्यात येणार आहे. ही ट्रेन आठवडय़ातून दोनदा धावणार असून मध्य रेल्वेने तिचे वेळापत्रकही जारी केले आहे. परंतु पश्चिम रेल्वेची मुंबई सेंट्रलवरून सुटणारी राजधानी सायंकाळी सुटते आणि सकाळी दिल्लीला लवकर पोहचते. परंतु मध्य रेल्वेची ही नवीन राजधानी सीएसएमटीहून दुपारी लवकर 2.20 वाजता सुटेल. त्यामुळे मुंबईकरांचा तो कार्यालयीन दिवस वाया जाईल तसेच सकाळीदेखील ती 10.25 वाजता हजरत निजामुद्दीन (दिल्ली) स्थानकात पोहचण्याची शक्यता धूसर असल्याने दुसराही दिवस वाया जाण्याची शक्यता आहे.
आधीची नाशिकमार्गे दिल्ली ट्रेन दुर्लक्षित
लोकमान्य टिळक टर्मिनसहून 2013 मध्ये सुरू झालेली एलएलटी-हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस आठवडय़ातून एकदाच सोडण्यात येते. वास्तविक तिला दर दिवशी सोडायला हवी होती. तिला राजधानीचा दर्जा नसल्याने तिला मागे ठेवण्यात येते. त्यामुळे तिला नेहमीच लेटमार्क बसत असतो. आता नव्या राजधानीचे वेळापत्रक बिझनेसमन लोकांसाठी गैरसोयीचे आहे. ते बदलायला हवे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सुभाष गुप्ता यांनी केली आहे.
ट्रकचे अपग्रेडेशन झालेले नाही
मुंबई ते दिल्ली 1519 कि. मी. चे अंतर असून ही ट्रेन ताशी 120 कि.मी.च्या वेगाने धावणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र मध्य रेल्वेच्या इगतपुरी ते भुसावळदरम्यान ट्रकची क्षमता ताशी 120 कि.मी.च्या वेगाने ट्रेन धावण्यासाठी अद्याप झालेली नाही. रेल्वे बोर्डाने जारी केलेल्या नियोजित वेळापत्रकात तिचा सरासरी वेग दर ताशी 76 कि.मी.इतका दाखविण्यात आला आहे. हा वेग खरे तर किमान दर ताशी 90 कि.मी. इतका तरी हवा होता असे सूत्रांचे म्हणणे आहे.
नाशिक आणि मध्य प्रदेशचा फायदा
आधीची राजधानी ही गुजरातमार्गे जात होती. मध्य रेल्वेच्या झोनमधून जाणारी पहिलीच राजधानी असून ती सीएसएमटी, कल्याण, नाशिक, जळगाव, खांडवा, भोपाळ, झाशी, आग्रा कॅण्टोन्मेंट आणि हजरत निजामुद्दीन असे थांबे घेत जाणार आहे. नाशिक येथून जाणार असल्याने नाशिककरांना 15-16 तासांत दिल्ली गाठता येईल.
































































