कागद बचतीने ग्राहकांना मिळणार सवलत, बीएसएनएलची आता ई-मेलवर बिले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर 

बीएसएनएलने 1 जानेवारीपासून दुरध्वनी व ब्रॉण्डबॅण्ड ग्राहकांना पाठविण्यात येणारे छापील बिलांऐवजी ग्राहकांना आता ‘ई’बिले मिळणार आहेत. या उपक्रमाने कागदबचत होणार आहे. हरित हिंदुस्थान उपक्रमाअंतर्गत नोंदणी केलेल्या ग्राहकाला दरमहा 10 रूपयांची सवलत बीएसएनएलने जाहीर केली आहे.

बीएसएनलने डिजिटल इंडिया आणि हरित हिंदुस्थान  उपक्रमाअंतर्गत पर्यावरण रक्षणासाठी बीएसएनएलने हे पाऊल उचलले आहे. यामुळे ग्राहकांना पाठविण्यात येणार्‍या छापील बिलांसाठी लागणार्‍या कागदाची बचत होणार आहे. ई-मेलवर बिले मिळण्यासाठी ग्राहकांना मोबाईल क्रमांक व ई-मेलची नोंदणी करावी लागणार आहे. ज्या ग्राहकांनी अद्याप नोंदणी केलेली नसेल त्यांनी खालीलप्रमाणे एसएमएस अथवा संकेतस्थळावरून नोंदणी करावी लागणार आहे.

लॅण्डलाईन ग्राहकांसाठी मोबाईल क्रमांकावरून – ईएमएस स्पेस बिलिंग अकाऊंट क्रमांक स्पेस ई-मेल आयडी असे टाईप करून 53334 यावर एसएमएस पाठवावा लागणार आहे.किंवा बीएसनलच्या संकेतस्थळावर जाऊन बिलींग अकाऊंट क्रमांक, ई-मेल आयडी, मोबाईल क्रमांक असा तपशील नोंदणी करावी अथवा अधिक माहितीसाठी नजिकच्या ग्राहक सेवा केंद्राशी तसेच बी.एस. एल.एल. टोल फ्री क्रमांक 1500 वर संपर्क साधावा, असे आवाहन बीएसएनएलचे सहायक महाव्यवस्थापक दत्तात्रय बी.भोर यांनी केले आहे.