
सामना ऑनलाईन,मुंबई
प्रलंबित मागण्यांसाठी ‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांचा संप तिसऱ्या दिवशीही सुरू असताना आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रशासनाविरोधात आज कर्मचाऱ्यांच्या संतापाचा भडका उडाला. कर्मचाऱ्यांनी वडाळा डेपोमध्ये जोरदार आंदोलन करून प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घ्या, अन्यथा 30 हजार कर्मचारी कुटुंबकबिल्यासह रस्त्यावर उतरू असा इशारा कामगारांनी दिला.
‘बेस्ट’ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांना होणाऱ्या गैरसोयीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने संपाच्या दुसऱ्या दिवशी ‘मेस्मा’अंतर्गत कारवाई सुरू केली. काही कामगारांना ‘बेस्ट’ वसाहतीमधील घरे रिकामी करण्याच्या नोटिसाही दिल्या. यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये प्रशासनाविरोधात असलेल्या संतापाचा आणखीनच भडका उडाला. वडाळा डेपोत आज सकाळी 11 वाजता शेकडोंच्या संख्येने कामगार जमले. त्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करून निषेध केला. यामध्ये महिलांचाही मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुमारे अडीच तास कर्मचाऱ्यांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला.
वडाळा डेपोला पोलीस छावणीचे स्वरूप
कामगारांना वसाहतीमधून घर सोडून जाण्याच्या नोटिसा दिल्यामुळे बुधवारी प्रशासनाविरोधात खडाजंगी झाली होती. कर्मचाऱ्यांच्या संतापामुळे नोटीस देण्यास गेलेल्या अधिकाऱ्यांना रिकामी हाताने माघारी परतावे लागले होते. या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत असल्यामुळे वडाळा डेपोत सकाळपासूनच कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यामुळे वडाळा डेपोला पोलीस छावणीचे स्वरूप आले होते.
तीन तास वाहतूक ठप्प
वडाळा डेपोत हजारो कर्मचाऱ्यांच्या जोरदार आंदोलनामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे डेपोसमोरील रस्त्यावरील वाहतूक तब्बल तीन तास ठप्प झाली होती.


























































