राहुल गांधींच्या नाकर्तेपणामुळे आम्ही आघाडीतून बाहेर पडलो!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

बिहारमध्ये जद(यू)ने काँग्रेसची साथ का सोडली याचे उत्तर मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी दिले आहे. राजदचे नेते लालूपुत्र तेजस्वी यादव यांच्यावर सरकारमध्ये असताना झालेल्या भ्रष्टाचारांच्या आरोपांवर काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी कोणतीही भूमिका घेण्यात असमर्थ ठरले होते आणि त्यांच्या याच नाकर्तेपणामुळे आम्हाला आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घ्यावा लागला असे नितीशकुमार यांनी स्पष्ट केले. नितीशकुमार पहिल्यांदाच त्यावेळच्या परिस्थितीवर बोलले.

2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला जदयूने मदत केली होती. परंतु तेजस्वी यादव यांच्यावरील आरोपांवर राहुल गांधी यांनी याबाबत एकही शब्द उच्चारला नाही की त्याचा उल्लेखही केला. आघाडीत असतानाही काँग्रेसने कोणतेही निवेदन प्रसिद्ध केले नाही. काँग्रेसने त्यावेळी योग्य निर्णय घेतला असता तर राजीनाम्याबाबत पुनर्विचार केला असता, असेही नितीशकुमार म्हणाले. तसेच राहुल गांधींच्या त्या भूमिकेमुळे मलाच लाजिरवाणे वाटत होते, असेही ते यावेळी म्हणाले.

भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) तेजस्वी यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केल्यानंतर नितीशकुमार आणि राष्ट्रीय जनता दल यांच्यातील तणाव वाढतच गेला होता. त्यानंतर नितीशकुमार यांनी राष्ट्रीय जनता दल, काँग्रेसशी असलेली आघाडी नितीशकुमार यांनी तोडत जुलै 2017 ला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.