जनता पाठीशी असल्याने मी कुणाचीही विकेट घेण्यास सक्षम!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

स्वानंद पाटील । परळी वैजनाथ

नाथ प्रतिष्ठान आयोजित नामदार चषकाच्या उदघाटनप्रसंगी धनंजय मुंडे जोरदार फॉर्मात दिसले. ‘आज क्रिकेटच्या मैदानावर उतरलो आहे. परळीची जनता, नेहमीच माझ्या पाठीशी असल्यामुळे कोणतेही मैदान मीच जिंकणार’, अशा शब्दात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी क्रिकेटच्या मैदानावर राजकीय फटकेबाजी केली. उद्घाटनाच्या क्रिकेट सामन्यात स्वतः मैदानात बॅट आणि बॉल घेऊन उतरत आपल्यातील क्रिकेट पटुचेही प्रदर्शन केले. प्रेक्षकांचा अलोट प्रतिसाद हे या उद्घाटन सामन्याचे वैशिष्ठ्य ठरले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय मुंडे अध्यक्ष असलेल्या नाथ प्रतिष्ठानच्या वतीने परळीत डे-नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, या स्पर्धेचे उद्घाटन आज त्यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत झाले.त्यावेळी ते बोलत होते कुणाची विकेट घेण्यासाठी कोणता बॉल टाकायचा हे आम्हाला चांगलेच माहिती आहे. यावेळी विरोधकांचे नाव न घेता पहिल्याच बॉलवर विकेट काढण्याचा आपला निर्धार आहे असा चिमटा त्यांनी काढला.