चहाच्या उधारीचे पैसे देण्याच्या वादावरून चाकू हल्ला करणर्‍या दोघांना शिक्षा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । संभाजीनगर

चहाच्या  उधारीचे पैसे मागितल्यावरून वाद झाला. संतापलेल्या मुकेश जवाहरलाल मुखरीजे (केवट) आणि विकास जवाहरलाल मखरिजे (केवट) या दोघांनी चाकू हल्ला केल्यामुळे त्यांना तीन वर्षाची शिक्षा सुनावली आहे.

कन्नड येथील पवार कॉलनीत राहणारा मुकेश जवाहरलाल मखरीजे (केवट) याचे वडील चहाचा स्टॉल चालवितात. ३ फेब्रुवारी २०१४ रोजी  विश्वानंद कॉलनी येथे राहणारे दिपक पोपटराव कुमावत हे आपल्या मित्रासह चहा पिण्यासाठी आले. त्यावेळी त्याला चहाची उधारी मागितल्यामुळे त्याच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. मुकेशने मध्यस्थी करून ते भांडण सोडविले मात्र त्याच्या मनात राग असल्यामुळे  दुपारी मुकेश, भरत धुपे, विकास मखरीजे (केवट) हे तिघे शरद पवार कॉलनीत गेले. त्यांनी दिपकला बोलवून घेतले. नंतर शिवीगाळ करत त्या तिघांनी लाथा – बुक्यांनी मारहाण केली. मुकेश आणि भरत या दोघांनी दिपकवर चाकू हल्ला केला तर विकास ने तो चाकू लपवला असल्याचे दिपक कुमवतने तक्रारीत म्हटले.

या तक्रारीवरुन मुकेश मखरिजे, भरत धुपे आणि विकास मखरिजे या तिघांजणाच्या विरोधात कन्नड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या खटल्याची अंतिम सुनावणी तदर्थ सत्र न्यायधीश एन. टी. घाडगे यांच्या समोर झाली असता अतिरिक्त लोकअभियोक्ता सतिष मुंडवाढकर यांनी दहा साक्षीदार तपासले. यामध्ये वैद्यकीय पुरावा आणि प्रत्यक्षदर्शीची साक्ष महत्वाची ठरली. न्यायालयाने मुकेशला तीन वर्ष साधा कारावास, १० हजार रुपये दंड, दंड  न भरल्यस सहा महिने साधा कारावास. पुरवा नष्ट केला म्हणून भादंवि २०१ खाली विकास केवट ला एक वर्ष साधा कारावास, ५ हजार रुपये दंड. दंड न भरल्यास सहा महिने साधा कारावासाची शिक्षा सुनावली तर भरत धुपे यास निर्दोष मुक्तता करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.