
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश असलेली दुसरी यादी जाहीर केली. माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना गेले महिनाभर दिल्लीदरबारी ठोकलेल्या मुक्कामाची बक्षिसी उमेदवारीच्या रूपाने मिळाली आहे. काँग्रेसच्या दुसऱ्या यादीत प्रस्थापित नेत्यांचा समावेश असून घराणेशाहीला काँग्रेसने अधिक महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे.
काँग्रेसने 13 मार्च रोजी महाराष्ट्रातील पहिली यादी जाहीर केली होती. आज दुसरी यादी जाहीर करताना काँग्रेसने आपल्या पंरपरेप्रमाणे घराणेशाहीलाच महत्त्व दिल्याचे दिसून येत आहे. यवतमाळ-वाशीममधून तिकीट मिळावे म्हणून गेले महिनाभर दिल्लीत ठाण मांडून बसलेले माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची मेहनतही फळाला आली आहे. धुळय़ातून माजी मंत्री रोहिदास पाटील यांचे आमदार सुपुत्र कुणाल पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर वर्ध्यातून माजी प्रदेशाध्यक्षा प्रभा राव यांची कन्या चारुलता टोकस यांना संधी देण्यात आली आहे. शिर्डीतून काँग्रेसने आमदार भाऊसाहेब कांबळे याना संधी दिली आहे, तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून नविनचंद्र बांदिवडेकर यांना रिंगणात उतरविण्यात आले आहे. दक्षिण मुंबईतून माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना तर नंदुरबारमधून के. सी. पडावी यांना उमेदवारी देण्यात आली आहे.


























































