वादळात तरणारा क्रांतीचा दूत

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> सानिया भालेराव

28 मार्च 1868 रोजी निझ्नीमध्ये जन्मलेला अलेक्साय मॅक्झीमोकिच पेश्कॉव्ह ऊर्फ ’मॅक्झिम गॉर्की’ हा सुप्रसिद्ध रशियन कथाकार आणि कादंबरीकार. गॉर्की सर्वपरिचित आहे ते त्याच्या ‘आई’ या कादंबरीमुळे. त्याचं अवघं लेखन माणूस, त्याचं जगणं, त्या जगण्यातलं सत्त्व आणि स्वत्व याभोवती फिरताना दिसतं. मॅक्झिम गॉर्कीला समाजवादी, वास्तवतावादी या साहित्यपद्धतीच्या जनकांपैकी एक मानले जाते. लहानपणातील संघर्षमय काळात जे जीवन अनुभवले. त्या कटू अनुभवांमुळेच त्याने लेखन करताना आपल्या नावापुढे ‘गॉर्की (कटुता)’ हे टोपण आडनाव घेतलं होतं. ‘थ्री ऑफ देम’, ‘दी लाइफ ऑफ मेत्केय कोझेम्याकीन’, ‘ओकुरोव्ह सिटी’ आणि ‘मदर’ या त्याच्या कादंबऱ्या गाजल्या मात्र जगभर प्रसिद्धी लाभली ती त्याच्या ‘दी लोवर डेप्थ्स’ या नाटकामुळे.

रशियातल्या एका छोटय़ाशा खेडय़ामध्ये 28 मार्च 1868 साली एक मुलगा जन्माला आला. वयाच्या सहाव्या वर्षी त्याचे वडील वारले. आईने दुसरा विवाह केला आणि त्याचा सांभाळ लोककथा सांगणाऱया प्रेमळ आजीने आणि कडक व शिस्तप्रिय आजोबांनी केला. आजोबांकडून घर चालेना आणि वयाच्या आठव्या वर्षी मजूर म्हणून हा मुलगा जहाजावर काम करू लागला. भांडे घासणे, साफसफाई करणे अशी लहान मुलांकडून कामं करवून घेतली जात. कायम मळलेले कपडे, पोटात अन्न न मिळाल्यामुळे सतत खवळलेली भूक अशा कित्येक विदारक गोष्टी त्याने लहान वयातच अनुभवल्या. मजुरीची कामं करता करता जसं जमेल तसं तो मुलगा शिकत गेला. पुढे 21व्या वर्षी भटका मजूर म्हणून काम करताना तो पाच वर्षे संपूर्ण रशिया पायी फिरला आणि साधारण 1880 मध्ये आयुष्यातला हा कडवटपणा लेखणीच्या माध्यमातून त्याने कागदावर उतरवायला सुरुवात केली आणि नावसुद्धा निवडलं. हा मुलगा म्हणजे प्रसिद्ध रशियन लेखक ‘अलेक्सी मॅक्सोविच पेशकोव’. त्यांनी ‘मॅक्झिम गॉर्की’ हे टोपणनाव निवडलं. ‘गॉर्की’, ज्याचा अर्थच मुळी होतो कडवट. त्यांना तब्बल पाचवेळा साहित्यामधल्या नोबल पुरस्कारासाठी नामांकनं मिळाली आहेत (रशियन उच्चारः माक्सिम गोर्की).

Makar Chudra या पुस्तकापासून सुरू झालेल्या त्यांच्या लेखनप्रवासात The Mother (आई), Chelkash (चेल्काश), Children of the Sun, My Childhood, The lower depths (द लोवर डेप्थ्स) अशी कित्येक पुस्तकं गाजली. विशेषतः आई हे त्यांचं पुस्तक स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इंग्लंड आणि जगाच्या कोपऱयांमध्ये पोहोचलं, वाचलं गेलं, विविध भाषांमध्ये अनुवादित केलं गेलं आणि गॉर्की यांना लोकप्रियता मिळवून दिली. तसं पाहायला गेलं तर गॉर्की यांच्या कथा कायमचं वास्तवतावादी आणि सामाजिक दृष्टिकोन देणाऱया असल्या तरीही सुरुवातीच्या काळातली त्यांची शैली रिव्होल्युशनरी रोमँटिक अशी होती. नंतरच्या काळात त्यांच्यावर प्रोलिटेरियन रिव्होल्युशनचा ( सर्वत्ववादी क्रांती) प्रभाव पडल्याने त्यांचं लिखाण सामाजिक मुद्दय़ांवर भाष्य करणारं होतं.

गॉर्कीने जेव्हा ‘मदर’ हे पुस्तक लिहिलं तेव्हा सगळीकडे खळबळजनक वातावरण निर्माण झालं होतं. खुद्द रशियामध्ये पुढची काही वर्षे हे पुस्तक वाचण्यास, त्याबद्दल मत मांडण्यास आणि चर्चा करण्यास मनाई होती. हे पुस्तक जगभरात पोहोचलं, कित्येक भाषांमध्ये अनुवादित झालं. मुळात ‘मदर’ ही गोष्ट होती एका मजुराच्या आयुष्याची आणि त्याच्यात आत्मभान जागृत होण्याच्या प्रवासाची. त्या काळात एक मजूर हा गोष्टीचा नायक असू शकतो हीच मुळात बंडखोर कल्पना आणि तेसुद्धा पुढे तो जागतिक क्रांतीचा भाग बनतो हे तर अगदीच न पटणारं. रशियामध्ये याच काळात मार्क्सवाद आपली मुळं घट्ट रोवत होता. सामाजिक, राजनैतिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाचा तो काळ होता. स्वतः गॉर्की उघडपणे मार्क्सवादी सामाजिक लोकशाही चळवळीशी जोडला गेला होता. ‘मदर’ या पुस्तकाबद्दल लेनिन असं म्हणाला होता की, हे पुस्तक कामगारवर्गाला अंतर्बाह्य सजग करणारं, त्यांच्यामध्ये आत्मभान निर्माण करण्याची प्रक्रिया रुजवणारं असं आहे. ‘मदर’ हे पुस्तक म्हणूनच गॉर्कीच्या लेखनप्रवासामधलं एक अत्यंत महत्त्वाचं पुस्तक ठरतं. कामगारवर्ग हाच समाजामध्ये खरा बदल घडवून आणू शकतो असं क्रांतिकारी मत या पुस्तकातून गॉर्कीने पहिल्यांदा पुढे आणलं.

आपल्या क्रांतिकारी विचारांमुळे आणि सजग लेखणीमुळे गॉर्कीवर दोनदा तुरुंगवास भोगण्याची पाळी आली, त्यावर कित्येक खटले चालवले गेले. गॉर्की नुसताच लेखक नव्हता. तो क्रांतिकारक होता. त्याला सर्वहारा वर्गाविषयी आस्था होती. तो स्वतः ज्या बिकट परिस्थितीतून वर आला त्याला त्याची जाण होती. त्याला विश्वास होता की, सर्वहारा वर्ग हाच क्रांतीचा वाहक आहे. ‘पायातील साखळदंडांशिवाय तुमच्याकडे हरण्यासारखं आता काहीही नाही’ या मार्क्सच्या वाक्याशी तो सहमत होता. नुसतंच लिहिणं यापुरतं त्याने स्वतःला मर्यादित ठेवलं नाही आणि म्हणूनच गॉर्की इतर लेखकांपेक्षा वेगळा भासतो. त्याने स्वतः राजकारण, समाजकारण यात सहभाग घेतला. लेखक फक्त लेखणीपुरता मर्यादित असतो या चौकटीला तडा देणाऱयांपैकी गॉर्की एक. पुढे त्याचे स्टॅलिन, लेनिनशीसुद्धा मतभेद झाले. नंतरच्या काळात त्याला अप्रत्यक्ष अशा गृहकैदेत ठेवण्यात आलं. त्याचा शेवट तसा दुर्दैवीच होता, पण लेखणीपलीकडे जाणारा लेखक, कामगारवर्गामध्ये क्रांतीची चेतना पेटवणारा क्रांतिकारी आणि मुळात आपण चळवळ करतो म्हणजे काय आणि ती नक्की कशाकरिता करायची अशा बेसिक प्रश्नांवर लिखाण करणारा आणि ज्याचे शब्द अशा भरकटलेल्या कार्यकर्त्यांना दिशा दाखवणारे ठरतात. म्हणून गॉर्की सगळ्यांहून वेगळा.

ज्या वयात फुलायचं असतं त्या लहान वयात समाजातल्या विखारी विषमतेमुळे ज्याच्या मनात कायमचा कडवटपणा उतरला तो मॅक्सिम गॉर्की. याच कडवटपणाला त्याने हत्यार केलं आणि जगभरात आपल्या लेखणीने क्रांतीचं वादळ आणलं. अंतोन चेकॉव्ह हासुद्धा एक नावाजलेला रशियन लेखक आणि नाटककार. त्याचा आणि गॉर्कीचा पत्रव्यवहार खूप सुंदर आणि तरल. गॉर्कीच्या मार्क्सवादी चळवळीमुळे त्याच्या प्रोफेसरशिपवर जेव्हा बंदी घालण्यात आली होती तेव्हा निषेध म्हणून चेकॉव्हनेसुद्धा आपलं पद सोडून दिलं होतं. गॉर्कीबद्दल चेकॉव्ह असं म्हणाला होता

“A time will come when people will forget Gorky’s works, but he himself will hardly be forgotten even in a thousand years.”

(एक वेळ अशी येईल की, लोक कदाचित गॉर्कीचं लिखाण विसरतील, पण खुद्द गॉर्कीला विसरणं मात्र त्यांना हजार वर्षे उलटली तरी शक्य होणार नाही). कारण गॉर्कीसारख्या लेखकांना फक्त त्यांच्या लेखणीपुरतं मर्यादित ठेवता येत नाही. त्याचे विचार हे परिवर्तनाचे, क्रांतीचे जनक आहेत. काळालादेखील बंदिस्त न करता येणारे, भौगोलिक सीमारेषांपलीकडे जाणारे आणि समाजात वर्गीकरणाच्या क्रमवारीत सगळ्यात तळाशी असणाऱया सर्वहारा वर्गाला नवीन दिशा देणारे. गॉर्की, तू कायम राहशील आमच्या मनात, जोवर आमच्या मनातली सजगता, अनुकंपा, सहृदयता, संवेदनशीलता, माणुसकी आणि जाण जिवंत आहे तोवर.

– [email protected]