5 वर्षाच्या चिमुरड्याचा खून करणाऱ्या सावत्र बापाला जन्मठेप

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, कोपरगांव

पाच वर्षांच्या मुलाचा खून केल्याप्रकरणी सावत्र बापाला  अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एन एन श्रीमंगले यांनी जन्मठेप व 5 हजार रुपयांचा दंड ठोठावला.  2 वर्षापूर्वी निर्मला वसंत पवार यांचा मुलगा दादू (5 वर्ष) याला आरोपी वसंत रोडोबा पवार याने ठार मारले होते. दादू याला वसंतने विहीरीत फेकून दिला होता, पोहता येत नसल्याने दादूचा बुडून मृत्यू झाला.

निर्मला हिचा दुसरा विवाह वसंत पवार याच्याशी झाला होता. पहिल्या नवऱ्याला मुलगा असल्याने वसंत दादूचा जाच करायचा. दोन वर्षांपूर्वी काहीही कारण नसताना संतापलेल्या वसंतने दादूला झोपेत असताना उचलला आणि विहीरीत फेकून दिला. दादूचा बुडून मृत्यू झाल्याने त्याच्या आईने म्हणजे निर्मलाने वसंत पवारविरोधात राहाता पोलीस ठाण्यात नोंदविली होती. राहाता पोलिसांनी वसंतला अटक केली आणि त्याच्याविरूद्ध खटला दाखल केला. न्यायाधीश एन.एन.श्रीमंगले यांनी या खटल्याची सुनावणी ऐकल्यानंतर वसंतला दोषी ठरवला होता. या खटल्यातील 8 साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी तसेच दोन्ही तपासी अधिकारी यांची साक्ष ग्राहय धरत श्रीमंगले यांनी वसंत पवारला जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणी  सरकारी वकील म्हणून शरद मारुती गुजर यांनी काम पाहिले. सहायक पोलिस निरीक्षक दहिफळे व वाठोरे, पोलीस बाळु गायकवाड यांनी सरकारी वकिलांना तपासकामात मदत केली.