… आणि कोंबडीचे पिल्लू घेऊन चिमुरड्याने थेट रुग्णालय गाठले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । नवी दिल्ली

लहानपण किती निरागस असते याची अनेक उदाहरणे दिसतील. निरागसपणा, निस्वार्थी विचार आणि स्वच्छ मन यामुळे लहान मुले आपसूकच सर्वांना आपल्याकडे चुंबकाप्रमाणे खेचून घेतात. असाच प्रकार मिझोराममध्ये घडला असून येथील एका चिमुरड्याने सर्वांची मनं जिंकली आहेत.

प्रसारमाध्यमातून आलेल्या वृत्तानुसार, येथील एक चिमुरडा खेळत असताना चुकून कोंबडीच्या पिल्लावरून त्याची सायकल गेली. असा प्रकार घडल्याने त्याने तेथून पळ न काढता आपल्याकडे असलेले सर्व पैसे घेतले आणि कोंबडीच्या पिल्लाला घेऊन रुग्णालय गाठले. एका हातात पैसे आणि एका हातामध्ये कोंबडीचे पिल्लू असा त्याचा फोटो एका युझरने फेसबुकवर शेअर केला.

फेसबुकवर शेअर केलेला फोटो आणि त्याच्या चेहऱ्यावरील अपराधीपणाचे निरागस भाव पाहून नेटिझन्सने यावर लाईकचा पाऊस पाडला. तसेच आतापर्यंत हा फोटो 85 हजारांपेक्षा जास्त लोकांनी शेअर केला आहे. कोंबडीच्या पिल्लाचे पुढे काय झाले हे कळाले नाही, परंतु या निरागस पोराने मात्र सर्वांचे मन जिंकले.

दरम्यान, हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो चिमुरडा ज्या शाळेत शिकतो तिथे देखील त्याचा सत्कार करण्यात आल्याचा फोटोही व्हायरल होत आहे.

mizoram-child1