
सामना प्रतिनिधी । बीड
दुष्काळी स्थितीत शेतकऱ्यांची जनावरे जगावीत यासाठी शासनाच्या परवानगीने बीड जिल्ह्यात ५९९ चारा छावण्या चालवल्या जात आहेत. मार्च महिन्यापासून सुरू असलेल्या या छावण्यांची बिले जून महिना जवळ आला तरी मिळालेली नाहीत. त्यामुळे छावणी चालक हैराण झाले असून आज म्हणजेच दि.२२ मे बुधवार रोजी आतापर्यंतची सर्व बिले दिली नाही तर छावण्या बंद करू असा निर्वाणीचा इशारा छावणी चालकांनी आज मंगळवारी प्रशासनाला दिला आहे.
या संदर्भात सर्व छावणी चालकांनी एकत्र येत मंगळवारी दुपारी निवासी उपजिल्हाधिकारी परळकर, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे यांना मागण्यांचे रितसर निवेदन दिले. छावणी चालकांच्या भावना तात्काळ जिल्हाधिकाऱ्यांना कळवल्या जातील असे आश्वासन निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिले आहे. त्यामुळे आता प्रशासन या सर्व छावणी चालकांचे बिले देण्यासंदर्भात काय भूमिका घेतात याकडे छावणी चालकांचे लक्ष लागले आहेत.































































